प्रशासन सज्ज; तयारी पूर्ण
पिंपरी, ता. १७ ः महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचे चोखपणे नियोजन केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस आणि महापालिका यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते भरारी पथकांच्या तैनातीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.
मतदार केंद्र...
मतदारांच्या सोयीसाठी दोन हजार ३४ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या केंद्रांची अधिकृत यादी शनिवारी (ता. २०) आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी शनिवारी (ता. २७) प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदान केंद्र...
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदार अधिकारी, एक शिपाई (१० टक्के राखीव कर्मचारी) असे एकूण अंदाजे २०५० मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार २५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
विविध पथकांची नियुक्ती
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे १४ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. आचारसंहिता पथक प्रमुख आणि उमेदवारांचे हिशोब तपासणी पथक प्रमुख यांचीही स्वतंत्रपणे नेमणूक केली आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समिती नियुक्त केली आहे. यामध्ये पोलिस आयुक्त व महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश आहे.
विविध कक्षांची स्थापना
- निवडणूक काळातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक बंदोबस्त केला आहे.
- प्रचार फेऱ्या, सभा आणि अवाजवी खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालय व क्षेत्रीय स्तरावर व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथके काम करतील.
- मतदारांवर प्रभाव टाकणे, प्रलोभन दाखवणे तसेच पैसे व मद्याची अवैध वाहतूक किंवा संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत.
- शहरातील विविध नाक्यांवर शस्त्रास्त्रे व अवैध वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी चेक पोस्ट पथके कार्यरत राहतील.
- आचारसंहिता भंगाची कोणतीही तक्रार आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महापालिका व प्रभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.
मतांचा टक्का वाढीसाठी...
निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम आखला आहे.
या मोहिमेद्वारे शहरातील तरुण मतदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
ऑनलाइन सुविधा
उमेदवारांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. उमेदवार हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील. तसेच मतदारांना आपले नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर ‘Search name in voter list’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे मतदारांना आपले नाव योग्य प्रभागात आहे की नाही हे तपासणे सोपे होईल, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी हर्डीकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

