मोठे खेळाडू स्पर्धांमधूनच घडतात

मोठे खेळाडू स्पर्धांमधूनच घडतात

Published on

पिंपरी, ता. १७ ः क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. खेळामुळे संघभावना निर्माण होते. ‘सकाळ प्रिमीयर लीग’चे उद्‍घाटन करताना खूप आनंद होत आहे. दिमाखदार क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा भरविल्या गेल्या पाहिजेत. या स्पर्धेमुळे खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतो. या स्पर्धांमधूनच मोठे खेळाडू निर्माण होतात, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आणि पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्ट्स ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या ‘सकाळ प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी (ता. १७) उद्‍घाटन करताना ते बोलत होते. क्रिसला डेव्हलपरचे संचालक विशाल अगरवाल, उपाध्यक्ष प्रतीक वाणी, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास लांडगे, उपाध्यक्ष संदीप नाणेकर, राजेंद्र वाघेरे व सारंग वाघेरे, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यावेळी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, सरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ, सहयोगी संपादक जयंत जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.
प्रास्ताविक करताना शीतल पवार म्हणाल्या, टीव्हीवर बघितलेली क्रिकेट मॅच असो किंवा आता पिंपरीतील मैदानात खेळत असलेली मॅच असो, दोन्ही मॅच बघताना तेवढाच उत्साह आहे. ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नाही, तर माध्यम समूह म्हणून विस्तारताना आम्ही वेगवेगळ्या इव्हेंटचे आयोजन करीत आहोत. यामध्ये कला, मनोरंजन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. हे लहान मुलांसह सर्व वयोगटांतील लोकांपर्यंत पोहचतेय. वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही नागरिकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतो तेव्हा तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होता. सर्वांच्या सहकार्यातूनच हे शक्य होत आहे.’’

विजेत्यांना लाखोंची बक्षिसे
पिंपरी येथील रयत शिक्षण संस्था संचालित नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. टेनिस चेंडूवर दिवस-रात्र पद्धतीने स्पर्धा खेळविली जात आहे. विजेत्या संघाला करंडक आणि दीड लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. उपविजेत्या संघाला चषक आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक असेल. तृतीय क्रमांकाच्या संघाला ७५ हजार, चषक तसेच चतुर्थ क्रमांकासाठी ५० हजार रुपये आणि चषक दिला जाईल. राज्यातील ३२ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

खेळाडू घडविण्यात ‘सकाळ’चा मोलाचा वाटा
‘मी मुंबईहून चिंचवडपर्यंत येतो, कारण तिथे माझी अकादमी आहे. त्यातून अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. अजूनही बरेच खेळाडू तयार होत आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची अकादमी आहे, असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. ही अकादमी घडविण्यात ‘सकाळ’चा खूप मोलाचा वाटा आहे. लहान मुलांची छायाचित्रे आणि बातमी ‘सकाळ’मध्ये यायची. त्‍यातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळायचे. आम्ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळायचो, तेव्हा शतक केले की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्व पेपर बघायचो की कुठे फोटो, बातमी आली आहे का? मग आम्ही तो पेपर विकत घ्यायचो. पेपरमध्ये बातमी आणि फोटे येणे म्हणजे ते आमच्यासाठी प्रोत्साहन असायचे. ‘सकाळ’चे यामध्ये खूप मोठे योगदान आहे,’ असे गौरवोद्गार वेंगसरकर यांनी काढले.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com