भाजपात कोणाला प्रवेश 
द्यायचा हे वरिष्ठ ठरवतील

भाजपात कोणाला प्रवेश द्यायचा हे वरिष्ठ ठरवतील

Published on

पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच गेली अनेक महिन्यांपासून अंतर्गत विरोधासह काही कारणास्तव रखडलेले अन्य पक्षातील स्थानिक नेत्यांचे पक्ष प्रवेश उद्या गुरुवारी (ता. १८) होणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता ‘पक्ष वाढीसाठी ताकदीचे लोक येत असतील तर पक्षात प्रवेश दिला जाईल. कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला नाही हे आम्ही वरिष्ठ ठरवू, तुम्ही सांगू नका.’ अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांना सुनावत काही माजी नगरसेवकांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा केल्याचे खात्रीलायकरीत्या कळते.
विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सत्तेची फळे चाखण्यासाठी भाजपात जाण्यासाठी शहरातील अनेक दिग्गजांनी प्रयत्न सुरु केले होते. पक्षात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमाने तयारी केलेले स्थानिक कार्यकर्ते या निर्णयामुळे दुखावले गेले. त्यामुळे शहराच्या विविध भागातील तयारी केलेल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या बाहेरून पक्षात येणाऱ्यांना कडाडून विरोध होता. यात निवडून येण्याची क्षमता असलेले काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात होती. त्यापैकी काही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे असे समजते.
पक्षात येऊ बघणाऱ्या काही माजी नगरसेवकांच्या नावाला पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचा विरोध होता. त्यासाठी एक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना भेटले व त्यांनी आपला विरोध दर्शविला. परंतु; चव्हाण यांनी त्यांना पक्षाची भूमिका ‘आपल्या पद्धतीने समजावून सांगितल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
---

आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?
सत्ता म्हटले की डोकी मोजली जातात. भाजपला कोणत्याही पद्धतीने पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणायची आहे. त्यामुळे एखाद्या स्थानिक नेत्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांची महापालिकेत संख्या वाढत असेल तर पक्ष त्याचाच विचार अगोदर करणार, हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे राजकीय धोरण निश्चित आहे. परंतु; पक्षात वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना आयुष्यात एकदा तरी आपली महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी वर्णी लागेल व नगरसेवक म्हणून आपण निवडून येवू, अशी भाबडी आशा असते. या पक्ष प्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते व ‘कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?’ असा प्रश्‍न भाजपचे काही स्थानिक कार्यकर्ते विचारत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com