महापालिकेच्या शाळेला ‘आयएसओ’ मानांकन

महापालिकेच्या शाळेला ‘आयएसओ’ मानांकन

Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : ‘आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा कारखाना-कंपनी व्यवसाय डोळ्यासमोर उभी राहते. हे मानांकन पटकावण्याची आश्चर्यकारक कामगिरी पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळेने केली आहे. ही शाळा आहे मोहननगरमधील श्रीमती लीलाबाई खिंवसरा मुले प्राथमिक शाळा!
जागतिक मानकांच्या २४ निकषांची पूर्तता केल्याने शाळेने ‘आयएसओ’ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे. ‘आयएसओ’ मिळविणारी ही महापालिकेची चौथी शाळा आहे.

किमयागार सतीश पाटील
ही शाळा १९८२ साली मध्ये सुरू झाली. या यशोगाथेचे किमयागार आहेत सतीश पाटील हे शिक्षक! यापूर्वी आकुर्डीच्या अजंठानगरमधील माता रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आणि माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा या दोन्ही शाळांना त्‍यांच्या प्रयत्नातून हे मानांकन मिळाले होते. या शाळेलाही हे मानांकन मिळावे म्हणून पाटील गुरुजींनी योजनाबद्ध प्रयत्न केले. मुख्‍याध्यापिका आशा निचळ यांच्यासमोर त्यांनी ही कल्पना मांडली. त्यानंतर श्रीकृष्ण केंगले, कविता लांडगे, मनिषा टिळेकर, रोहिणी दिवेकर, बालवाडीच्या छाया बाचकर, प्रतिभा गायकवाड, सुरेखा शिरसाट हे या मोहिमेत सहभागी झाले. या शाळेत बालवाडी ते सातवीपर्यंतचे ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात.

स्वयंअध्ययनावर भर
अभ्यासाबरोबर परिसर अभ्यासातून ही मुले जास्तीतजास्त शिक्षण घेण्याचे काम करतात. शाळेसमोरील परसबागेतही विविध वनस्पतींची माहिती मिळते. ही मुले गांडूळखत, शेती, संगणक शिक्षण आदी उपक्रमांतही सहभागी असतात. या प्रत्येक आकलनासाठी मुलांसाठी ‘अद्ययावत वाचनालय तयार केले आहे. शाळेतच वृत्तपत्रांचे वाचनालय सुरु करण्यात आलेले आहे. यामध्ये दैनिकांचे वाचन तर घडतेच पण चालू विषयांवर मुलांमध्ये चर्चाही घडते.
उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक प्रमिला जाधव, जयमाला गावडे यांनी या शाळेची प्रशंसा केली आहे.
-----

काय आहेत निकष
आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेद्वारे शाळांच्या आयएसओ मानांकनासाठी शासनाने निर्धारित केलेले २४ निकष असे
१- पर्यावरण संवर्धन
२- स्वच्छता
३- विद्यार्थी गुणवत्ता
४- विद्यार्थ्यांचे कलागुण
५- बोलक्या भिंती
६- गांडूळखत प्रकल्प
७- शून्य कचरा प्रकल्प
८- डिजिटल वर्गखोल्या
९- प्रयोगशाळा
१०- विद्यार्थ्यांसाठी सुविधा
११- दहा भौतिक सुविधा
१२- गुणवत्तावाढ
१३- विद्यार्थ्यांची उपस्थिती
१४- संगणक लॅब
१५- वर्गातील फळे
१६- वकृत्व स्पर्धा
१७- बैठक फाउंडेशन मार्फत शास्त्रीय नृत्य, गायन, वादन
१८- वार्षिक खेळ
१९- विद्यार्थी आरोग्य तपासणी,
२०- गुडटच व बॅडटच माहिती विद्यार्थ्यांना देणे
२१- शाळेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक द्वारा मार्गदर्शन
२२- पिण्याच्या पाण्याची बचत करणे
२३- व्यसनमुक्ती मार्गदर्शन


२४- पायाभूत सुविधा
---
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत शाळेने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. निकषांच्या पूर्ततेविषयी सर्व बाबींची तपासणी करून आयएसओ मानांकनावर शिक्कामोर्तब झाले. तसे चे प्रमाणपत्र देण्यात आले. मुलांना चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात वास्तवतेशी निगडित शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत होत आहे.
- आशा निचळ, मुख्याध्यापिका, श्रीमती लीलाबाई खिंवसरा मुले प्राथमिक शाळा
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com