ऑनलाइन दंड भरा आणि चिंतामुक्त रहा
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर थेट नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर दंडाची रक्कम आणि नियमांच्या उल्लंघनाची माहिती संदेशाद्वारे पाठवली जाते. मात्र, अनेकांना ऑनलाइन दंड कसा भरावा, हेच माहीत नसते किंवा माहीत असूनही अनेकजण दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष महागात पडू शकते. देशभरात कुठेही पोलिस किंवा आरटीओने पकडले तर पूर्वीच्या दंडाची रक्कम भरण्याचा तगादा लावला जात असल्याने ऐनवेळी तुमचे आर्थिक गणित कोलमडू शकते. त्यामुळे ऑनलाइन दंड भरा आणि चिंतामुक्त राहा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
परिवहन विभागाने २०१४ मध्ये वाहन-१ पोर्टल विकसित केले. यावर नवीन वाहनांबरोबरच जुन्या वाहनांचीही ऑनलाइन नोंदणी टप्याटप्याने सुरू झाली. नोंदणीवेळीच संपर्क क्रमांक जोडला जात आहे. त्यामुळे वाहन खरेदी, विक्री किंवा वाहन हस्तांतरणाबाबत कोणताही व्यवहार केला तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवला जात आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडिंग, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, अशा विविध कारणांमुळे पोलिस किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दंड लावला जातो.
दंडाची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने वाहनावर लागलेला दंड आणि उल्लंघनाच्या प्रकाराची माहिती नोंदणीकृत नंबरवर मेसेजद्वारे येते. बहुतांश वेळा वाहनांचा नंबर कॅमेरात स्कॅन होताना अक्षर किंवा अंक चुकल्यामुळेही एका वाहनाचा दंड दुसऱ्याच वाहनाला बसू शकतो. म्हणूनच तुमच्या वाहनावर दंड पडला किंवा नाही, याची वेळोवेळी खात्री करा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
------
येथे तपासा दंडाची रक्कम
- mahatrafficechallan. gov.in वेबसाइटवर E-Challan Payment Maharashtra State दिसेल
-वाहन क्रमांक निवडून चेसिस नंबरचे शेवटचे चार आकडे टाका
- व्ह्यूच्या दुसरा कॉलमखाली डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा
- चालान क्रमांक, तारीख, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, वाहनाचा नंबर, पेमेंट स्टेटस, चालान रक्कम, चालनाची जागा, पुरावे, कारणे आदी तपशील तपासा
----
असा भरा दंड
वेबसाइट पेजवर फाइनवर टीक करून, सिलेक्ट ई-चालान ॲण्ड क्लिक हिअर टू पे हे बटन क्लिक करावे. त्यानंतर पेमेंटच्या ''टर्म ॲण्ड कंडिशन सिक्युरिटी पॉलिसी'' वाचून नंतर ''ॲग्री'' ऑप्शनवर टीक करावी. नंतर उजव्या बाजूला ''पे-नाऊ'' बटनवर Pay Through BillDesk या ऑप्शनवर क्लिक करावे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्यूआर कोड या ऑप्शनद्वारे पेमेंट करता येते. आरटीओच्या एम. परिवहन किंवा पोलिसांच्या महाट्रॅफिक या दोन मोबाईल ॲपवरूनही चालानची रक्कम भरता येते.
---
तक्रारही करता येते
वेबसाइटवरील माहितीमध्ये पुरावे भागात क्लिक केल्यावर वाहनाचे चालान टाकले गेलेल्या ठिकाणाचा फोटो जोडलेला असतो. नाव तुमचे असेल, वाहन तुमचे नसेल तर तक्रारही करता येते.
-----
फोटो
78185

