नववर्ष पार्ट्यांवर ‘एफडीए’ची करडी नजर
पिंपरी, ता. २३ : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे तरुणाईला ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागले आहेत. या निमित्त मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यासाठी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. मात्र, येथे होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिस, अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हिंजवडी, रावेतसह लगतच्या परिसरात मोठ्या संख्येने तरुणाई वास्तव्यास आहे. यात विविध कंपन्यांतील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रो-हाऊस, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरांसह लोणावळा आणि मावळ परिसरातील हॉटेल्स सजली आहेत. पंचतारांकित हॉटेलपासून साध्या हॉटेल्सनाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीजे, गाण्यांचे लाइव्ह शो आयोजित करण्यात आले आहेत. काही हॉटेल्समध्ये विशेष ‘पॅकेज’ दिले जात आहे. तरुण-तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. दोन जणांसाठी दीड हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे पास दिले जात आहेत. जोडपे असेल तर तिकिटावर सवलत दिली जात आहे.
कुठे चालतात पार्ट्या ?
हिंजवडी, रावेत, लोणावळा, पवना बॅकवॉटर, रिसॉर्ट् स, खासगी रो-हाऊस
पार्टीसाठी परवानगी घेतली का ?
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण आतुरलेले आहेत. त्याकरिता अनेक जण जय्यत तयारीलाही लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, पब आणि रो-हाऊस बुकिंगही केले आहेत. तर अनेकांनी मोकळ्या मैदानात, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लाऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून विनापरवानगी पार्ट्या केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर
या पार्टी आयोजनानिमित्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेलचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांकडून आगाऊ नोंदणी
३१ डिसेंबरसाठी तरुणांबरोबरच हॉटेल्स सज्ज झाली आहेत. हॉटेल व्यावसायिक कॉलेजचे विद्यार्थी, कंपन्यांत काम करणारे तरुण-तरुणी फोन करुन विविध ऑफर्सची माहिती देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सनी मेन्यूवर सवलती व विशेष पॅकेजची व्यवस्था केली आहे.
पुणे जिल्ह्यात ‘एफडीए’चे १८ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे.
- दिगंबर भोगावडे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

