पुढील आठ दिवस निर्णायक

पुढील आठ दिवस निर्णायक

Published on

पिंपरी, ता. २३ : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता. २३) उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती सुरू झाली आहे. पुढील मंगळवार (ता.३०) दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार असून माघारीसाठी दोन जानेवारी मुदत आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाकडून लढायचे? महाविकास आघाडी होणार का? कोणता पक्ष कोणासोबत मैत्री करणार? याबाबत निर्णय न झाल्याने पुढील आठ दिवस इच्छुकांसाठी घाईगडबडीचे ठरणार आहेत. त्यामुळे त्यांना वेळेत निर्णय घेऊन निवडणूक लढविण्याची दिशा ठरवावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत ‘इनकमिंग’ सुरू आहे. त्यात भाजपने आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा अद्यापही ‘एकत्र’ की ‘स्वतंत्र’ लढायचे, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणूक कशी वळविली जाणार? प्रभागांतील लढती कशी होणार? कोण, कोणाच्या विरुद्ध लढणार? याचे चित्र अस्पष्ट आहे. कारणे काहीही असली, तरी निवडणुकीसाठी इच्छुकांसाठी मात्र पुढील आठ दिवस अर्थात अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ३० डिसेंबर आणि अर्ज माघारीची मुदत दोन जानेवारी आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस निर्णायक ठरणार असून त्यानंतरच लढतींचे चित्र स्पष्ट होईल, अशी सद्यःस्थिती आहे.

तीस डिसेंबर; तीन तास महत्त्वाचे
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एका जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. अगोदरच उमेदवारी जाहीर केल्यास अन्य इच्छुक नाराज होऊन अन्य पक्षात जाऊ शकतात किंवा बंडखोरी करू शकतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात मंगळवार, ३० डिसेंबर रोजी ऐनवेळी काहींची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी दोनपर्यंत आहे. त्यामुळे ३० डिसेंबर प्रमाणेच त्या दिवसाचे तीन तासही महत्त्वाचे ठरणार आहेत.


काही अनुत्तरीत राजकीय समीकरणे
महायुतीबाबत....
- भाजपसोबत लढायचे, की स्वतंत्र याबाबत मित्रपक्ष शिवसेनेची भूमिका अद्याप अस्पष्ट
- भाजपसोबत शिवसेना लढल्यास जागा किती मिळणार? स्वतंत्र लढल्यास सर्व जागांवर उमेदवार देता येतील का?
- भाजपचा मित्र पक्ष रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) भाजप किती जागा सोडणार?
- रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र चिन्हावर लढणार की भाजपच्या चिन्हावर?, अद्याप निर्णय नाही
- भाजपमध्ये २५ पेक्षा अधिक जणांनी प्रवेश केला आहे, त्यांना तिकीट दिल्यास निष्ठावंतांची भूमिका काय असणार?
- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपमध्ये दाखल झालेत, त्यामुळे त्या तोडीचे उमेदवार स्वतंत्र लढण्यासाठी मिळतील का?

महाविकास आघाडीबाबत...
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्थानिक पातळीवर अद्याप एकवाक्यता नाही
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची जोरदार चर्चा
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची चर्चा
- दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे)-मनसे एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका काय?
- काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (ठाकरे) एकत्र लढल्यास जागा वाटप कसे करणार?
- महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र न लढल्यास वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय?
---

Marathi News Esakal
www.esakal.com