पीसीएमसी मेट्रो स्थानकात
दिव्यांग प्रवाशांची गैरसोय

पीसीएमसी मेट्रो स्थानकात दिव्यांग प्रवाशांची गैरसोय

Published on

पिंपरी, ता. २३ : पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात उभारण्यात आलेले दिव्यांग भवन शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी आधारवड ठरत आहे. विविध थेरपी, उपचार, सल्ला आणि सेवांसाठी रोज मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक तेथे येतात. पुणे शहरातून तसेच पिंपरी चिंचवडमधील विविध भागांतून येणाऱ्या दिव्यांगांठी मेट्रो हा सोईस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरला आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानकातील लिफ्ट मात्र वारंवार बिघडतात तसेच व्हीलचेअरच्या अपुऱ्या असल्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे.
महापालिकेने उभारलेल्या दिव्यांग भवनमध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, समुपदेशन तसेच इतर उपचार सुविधा उपलब्ध आहेत. तेथे रोज सुमारे पाचशे ते सातशे दिव्यांग नागरिक ये-जा करतात. पीएमपी बससेवा अथवा खासगी वाहनांच्या तुलनेत ते मेट्रोला पसंती देतात. शहरातील महत्त्वाचे आणि वर्दळीचे स्थानक असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्थानकात सध्या केवळ दोनच व्हीलचेअर उपलब्ध आहेत. दिव्यांगांची ये-जा पाहता ही संख्या अत्यंत अपुरी ठरत आहे. अनेक वेळा दोन्ही व्हीलचेअर वापरात असल्याने इतर दिव्यांगांना मेट्रो स्थानकावर ताटकळत थांबावे लागते. याशिवाय, मेट्रो स्थानकातील लिफ्ट वारंवार बंद पडणे किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होणे, हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. जिने चढणे शक्य नसलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी प्रवाशांना यामुळे बराच त्रास सहन करावा लागतो. लिफ्ट बंद असल्यास फलाटापर्यंत पोहोचणे कठीण होते. काही वेळा प्रवासच रद्द करण्याची वेळ येते.
---
पीसीएमसी मेट्रो स्थानकात प्रशासनाने किमान चार ते पाच व्हीलचेअर उपलब्ध करून द्याव्यात, तसेच लिफ्टच्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्या. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मदत व्यवस्था व कर्मचारी नेमावेत. या समस्या दूर झाल्यास दिव्यांग बांधवांसह अबालवृद्धांचा मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
- हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती
....

Marathi News Esakal
www.esakal.com