रावेतमध्ये जादा नफ्याचे आमिष; व्यावसायिकाची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ६८ लाख ८५ हजार २५७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना रावेत परिसरात घडली. या प्रकरणी रावेत येथील ४९ वर्षीय व्यक्तीने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा शेअर मार्केट गुंतवणुकीचा व्यवसाय असून, आरोपींनी फिर्यादीला एका अॅपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये खात्रीशीर नफा मिळतो, असे सांगून विविध बँक खात्यांत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुमारे ६८ लाख ८५ हजार २५७ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतविलेल्या रकमेवर दोन कोटी रुपये नफा झाल्याचे दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे नफा काढण्यासाठी आणखी पाच टक्के अतिरिक्त चार्जेसची मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम आणि नफा दिला नाही. यामध्ये त्यांची आर्थिक फसवणूक झाली.
तरुणाला फावड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा
पिंपरी : लिफ्ट वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला फावड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना निगडीतील त्रिवेणीनगर येथे घडली. रामलिंग रावसाहेब सुकळे (रा. फ्लॅट नं. ५०९, शरदनगर, निगडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश गायकवाड व एक महिला आरोपी (दोघेही रा. एस.आर.ए. इमारत, शरदनगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे लिफ्टने जात असताना आरोपी गणेश गायकवाड याने फिर्यादी यांना लिफ्टमध्ये येण्यास विरोध करीत शिवीगाळ करून वाद घातला. घडलेल्या घटनेबाबत ते सांगण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता महिला आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत पकडून ठेवले. त्यानंतर आरोपी गणेश गायकवाड याने प्लॅस्टिक पाइपने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण केली. तसेच फावड्याने मारहाण केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले.
गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई निगडी येथील आझाद चौकाजवळ करण्यात आली. सिद्धार्थ केरबा सोनवणे (रा. जिवलग हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून २९० ग्रॅम गांजा व एक मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी
पिंपरी : भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर झाला. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली. योगेश सुभाष पोहकर (रा. भास्कर धावडे चाळ, भोसरी) असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुलतान मोहम्मद इरफान (रा. मोहननगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने भरधाव रिक्षा चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
---

