उद्योगनगरीत उत्साहात लक्ष्मीपूजन
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २१ ः दारी फुलांचे तोरण, अंगणी मनोहारी रांगोळी, आकर्षक रोषणाई, दिवे-पणत्यांचा प्रकाश आणि पारंपरिक पेहरावात एकत्र आलेले कुटुंब... अशा उत्साही व आनंददायी वातावरणात मंगळवारी (ता. २१) उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये घरोघरी तसेच बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजन साजरे झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.
दिवाळीच्या प्रकाशपर्वामुळे सारे शहर आनंदात न्हाऊन गेले आहे. घरे, व्यापारी पेढ्या, आस्थापने, मंदिरे आणि शहरातील रस्ते प्रकाशाने उजळले आहेत. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजनाचा. यादिवशी देवी लक्ष्मीसोबत, धनदेवता कुबेर आणि गणपतीचे पूजन करणे शुभ मानले जाते. घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.
मंगळवारी सकाळपासून सर्वत्र लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी, सायंकाळी आणि रात्री असा तिन्ही टप्प्यांत मुहूर्त होता. सायंकाळी पारंपरिक पोशाखात सहकुटुंब एकत्र येऊन नागरिकांनी विधिवत पद्धतीने लक्ष्मी-कुबेरपूजन केले. पूजेच्या प्रारंभी नवीन वह्यांवर स्वस्तिक काढण्यात आले. त्यावर ‘श्री’ लिहून लक्ष्मी, सरस्वतीची प्रार्थना करण्यात आली. श्री गणरायाला सुख, समृद्धी व निरोगी आरोग्याचे साकडे घालण्यात आले. लक्ष्मीपूजनामुळे दुकानांतही उत्साहाचे वातावरण होते. मुहूर्तावर पूजा करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पूजेच्या साहित्याची आधीच तयारी करून ठेवली होती. ऊस, हळदी-कुंकू, खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, आंब्याची पाने, लाह्या, बत्तासे, पेढे ठेऊन वह्यांची पूजा करण्यात आली. आरतीने पूजनाची समाप्ती झाली. पूजेनंतर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. या आतषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला.
------------
चोपड्यांचे पूजन
शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारच्या तसेच सायंकाळच्या मुहूर्तावर दुकानांची पूजा केली. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन चोपड्यांचे पूजन केले जाते. यंदाही सहपरिवार चोपड्यांचे पूजन झाले. व्यापारी पेढ्या, खासगी आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा उदंड उत्साह दिसत होता.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.