आवाज वाढवू नको ‘डीजे’, तुला आईची शपथ हाय...
पिंपरी, ता. १७ ः शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त शनिवारी (ता. १६) दुपारनंतर सर्वत्र ‘डीजे’चा दणदणाट सुरू राहिला. ध्वनी प्रदूषणाच्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसून आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. रात्री दहानंतर अनेक मंडळांचे ‘डीजे’ बंद झाले. मात्र, मोठ्या मंडळांतील किंवा राजकीय पक्षांकडून आयोजित दहीहंडी उत्सवात ‘डीजे’चा दणदणाट रात्री दहानंतरही सुरू होता. ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्णांसह सर्वसामान्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
शहरात शनिवारी सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. शहरातील अनेक ठिकाणी आयोजकांकडूनही गोविंदांसाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. दहीहंडी उत्सवात तरुणांसह, महिला आणि ज्येष्ठांनी सहभाग नोंदविला. तरुणांमध्ये उत्साह ओसांडून वाहत होता. या उत्सवात अनेक ठिकाणी ‘सेलिब्रिटीं’नी हजेरी लावल्यामुळे गोविंदांसह तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला. शहरातील बहुतांश मंडळांनी करमणुकीसाठी ‘डीजे’ लावले. दुपारपासूनच मोठ्या आवाजात ‘डीजे’ सुरू झाले. संध्याकाळी सहानंतर दहीहंडी बघायला येणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर ‘डीजे’चा आवाजही वाढला. आवाजाच्या मर्यादा ओलांडल्याचे भानही ‘डीजे’ मालक आणि दहीहंडी आयोजकांचे राहिले नाही. दहीहंडी उत्सवात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. तरुणाई ‘डीजे’च्या ठेक्यावर थिरकत होती. पण, जल्लोष करताना तरुणांचे आवाजाच्या मर्यादेकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. आवाजाचे सर्व नियम पायदळी तुडवून दिवसभर ‘डीजे’ वाजवले जात असल्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे कोणी आहे की नाही ? असाच प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
आवाजाची मर्यादा किती ? (सर्व आकडे डेसिबलमध्ये)
शांतता क्षेत्र : ५० (दिवस), ४० (रात्री)
निवासी क्षेत्र : ५५ (दिवस), ४५ (रात्री)
व्यावसायिक क्षेत्र : ६५ (दिवस), ५५ (रात्री)
औद्योगिक क्षेत्र : ७५ (दिवस), ७० (रात्री)
कानाची क्षमता किती ?
७० डेसिबल या मर्यादेपर्यंत आवाज कान सहन करू शकतात. ८० ते १०० डेसिबल मर्यादेचा आवाज सतत कानावर पडल राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. १०० ते १२० डेसिबल दरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. चक्कर येऊ शकते. या आवाजामुळे कानाची हृदयाला जोडलेली नस स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हृदय विकाराचा तीव्र झटका येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकशाहीत मिरवणुका आणि आनंदोत्सव याला विरोध नाही. पण, त्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन आणि इतरांच्या जीवनशैलीवर आक्रमण म्हणजे सामाजिक गैरजबाबदारी आहे. उत्सव साजरे करण्याची एक सुसंस्कृत चौकट असावी.
- प्रा. अभय कुलकर्णी
ध्वनिप्रदूषण हा फक्त कानाला त्रास देणारा आवाज नाही. तर तो मानसिक आरोग्यावरही हल्ला करतो. झोप न लागणे, तणाव, चिडचिड, अशांतता हे गंभीर दुष्परिणाम आहेत.
- डॉ. सविता देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ
सततचा आवाज म्हणजे मानसिक छळ आहे. हा त्रास सोसणे ही शिक्षा वाटते.
- सुरेश जाधव, ज्येष्ठ नागरिक
सतत मोठा आवाज कानावर पडला; तर बहिरे होण्याची शक्यता असते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सण-उत्सवात ‘डीजे’ लावण्याचा कल वाढत आहे. पण, या सण-उत्सवानंतर ‘डीजे’ समोर नाचत असलेले किंवा उभे राहिल्याने ऐकण्यास कमी येते. एका किंवा दोन्ही कानांना कायमचे बहिरेपण आले, असे रुग्ण रुग्णालयात येत असून या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऐकण्याच्या संदर्भात कोणताही त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार घ्यावेत.
- डॉ. अनिकेत लाठी, कान-नाक-घसा तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.