संवाद माझा

संवाद माझा

Published on

झाडांची छाटणी करून कचरा रस्त्यावरच
बिजलीनगर, चिंचवड, पाटील मेडिकलजवळ बंगला आहे. तेथे झाडांची छाटणी करून उर्वरित कचरा तेथे टाकण्यात आला आहे. आमच्या बंगल्यात तीन मोठी झाडे आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्यांची स्वखर्चाने झाडाची छाटणी करतो. पण, तो हिरवा कचरा पुढे कित्येक दिवस तसाच घराबाहेर पडून राहतो. पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. हा वर्षानुवर्ष अनेक वर्षांचा अनुभव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठलेल्या या हिरव्या कचऱ्यामुळे साप, विंचू यांचे भय असते. एका वर्षी तर अशा कचऱ्यात साप लपला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी.
-डॉ. गिरीश रांगणेकर, बिजलीनगर, चिंचवड
PNE25V26360

रस्ता सुधारणेचे काम अर्धवटच
पिंपळे सौदागरच्या शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्ता अर्बन डिझायनिंगअंतर्गत आधुनिक करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या भागाचा अर्धा रस्ता तयार झाला आहे, तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना ठेकेदाराने साइडपट्टी व्यवस्थित केलेली नाही. त्यामुळे शाळेत पायी जाणारी मुले, त्यांचे पालक, मॉनिंग वॉकसाठी कुंजीर मैदानात जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना त्रास होत आहे. पावसामुळे चिखल, माती आणि राडारोड्याचे उंचवटे, खड्डे, हे सांभाळून जावे लागत आहे. त्यातच शेजारून जोरात हॉर्न वाजवत जाणारे दुचाकी, रिक्षा, चारचाकी चालक यांच्यापासून स्वत:चा बचाव करत मार्गक्रमण करावे लागते. यात भर म्हणून ठेकेदाराने अनेक ठिकाणी मातीचे ढिग, जुने-नवे सिमेंट पाइप, पाण्याची टाकी असे अडथळे निर्माण करुन ठेवले आहेत.
- रमाकांत डास, पिंपळे सौदागर
PNE25V26361

नव्या रस्त्याचे काम सुरू, पण अनेक अडचणी
तळेगाव दाभाडे शहरातील मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे वराळे हद्दीपर्यंत सध्या रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण सुरू आहे. फक्त मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकाच बाजूने नगर परिषदेने पूर्वीपासून पदपथ टाकला आहे. त्यावरही काही जणांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या सगळ्या पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर असलेल्या या रस्त्यावरचा पदपथ सध्या या नवीन कामांमुळे समतल झाला असून तोही उखडला आहे. त्यावरील चेंबर उघडे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी जायला जागा नाही. हे नवीन रस्त्याचे काम करताना उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. दोन-तीन ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठून वाहतूक कोंडी होत असते. येथील सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठणार आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी आर्थिक उधळपट्टी होणार आहे.

-दिलीप डोळस, तळेगांव दाभाडे
PNE25V26359

‘एचएसआरपी’च्या ऑनलाइन प्रक्रियेत अडथळे
उच्च सुरक्षा नंबर प्लेट अर्थात ‘एचएसआरपी’च्या ऑनलाइन प्रक्रियेत ‘एरर’ येत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून तारीख घेता येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरटीओने १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे यंत्रणेतील तांत्रिक अडथळे दूर करावेत, अशी आमची मागणी आहे.
-दिनेश देवकाते, मोहननगर, चिंचवड
PNE25V26362

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com