विद्यार्थी बस पासचा प्रस्ताव धूळखात !   
आयुक्तांच्या मंजुरीची प्रतिक्षा ः शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना मिळेना पास

विद्यार्थी बस पासचा प्रस्ताव धूळखात ! आयुक्तांच्या मंजुरीची प्रतिक्षा ः शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना मिळेना पास

Published on

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध टेबलांवर फिरत आहे. परिणामी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळत नाहीत. तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना वार्षिक रक्कमेच्या २५ टक्के रक्कम भरून मिळणाऱ्या पासचा प्रस्तावही धुळखात पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ हद्दीत पीएमपीएमएलकडून सेवा दिली जाते. पीएमपीएमएलमधून दररोज साधारण ८ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये विद्यार्थी, महिला, चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिला जातो. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना वार्षिक रक्कमेच्या २५ टक्के रक्कम भरून पास दिला जातो. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्यात येत आहेत. पण, अजूनही पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलकडून मोफत बस पास आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना २५ टक्के भरून पास दिला जात नाही. पालक, विद्यार्थी पास केंद्रावर दररोज हेलपाटे मारत आहेत. पण, महापालिकेकडून पीएमपीएमएलला बस पासबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याने पास देता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांकडून आर्थिक भुर्दंड
‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने बस पासचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिकेला एप्रिलमध्ये पाठवला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रस्तावाची फाइल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध टेबलांवर फिरत आहे. पण, अजूनही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. २९ एप्रिल रोजी हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्तांनी या प्रस्तावावर ६ जूनपर्यंत हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला नव्हता. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सहा जून रोजी हा प्रस्ताव आयुक्त शेखर सिंग यांच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. पण, २० दिवस झाले तरी अजूनही आयुक्तांनी प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास मिळत नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

‘‘शाळा सुरु होऊन आठवडाभर झाला तरी पास मिळालेला नाही. ऑनलाइन प्रक्रिया असूनही प्रत्यक्ष जाऊनच अर्ज सादर करावा लागतो. रोज कामाचा खोळंबा होतोय.
- रवींद्र जाधव, पालक

‘‘माझं घर पिंपरी-चिंचवड हद्दीत आहे पण मुलाची शाळा पुणे महापालिकेच्या हद्दीत येते. दोन्ही पालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने अजूनही पास मिळालेला नाही.
- लता चव्हाण, पालक, रावेत

‘‘आमची मुले केंद्रीय विद्यालयात शिकतात. त्यांना रोज १२० रुपयाचे तिकीट काढून द्यावे लागते, मात्र २५ टक्के शुल्कचा पास सुरू झाल्यास आम्हाला खूप दिलासा मिळेल.
- अमोल शिंदे, पालक, निगडी

आकडे बोलतात....
महापालिकेच्या शाळा ः १६४
खासगी शाळा ः ५०१
एकूण शाळा ः ६६५
महापालिका शाळेतील विद्यार्थी ः ४८,०००
खासगी शाळेतील विद्यार्थी ः २,०२,०००
एकूण विद्यार्थी ः २,५०,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com