निबंधक कार्यालयात ‘दुय्यम’ वागणूक
सुविधांचा बोजवारा ः अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती दिल्‍या जात नसल्‍याच्‍या तक्रारी

निबंधक कार्यालयात ‘दुय्यम’ वागणूक सुविधांचा बोजवारा ः अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती दिल्‍या जात नसल्‍याच्‍या तक्रारी

Published on

प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्‍तसेवा

पिंपरी, ता. २८ : ज्‍येष्ठ नागरिकांना लिफ्टची सोय नाही, नागरिकांना योग्य माहिती सांगितली जात नाही. मालमत्‍ता नोंदणीसाठी उशीर, चुकीच्या मालकाच्या नावाने नोंदणी, एकाच मालमत्‍तेची दोन नोंदणी यासह असंख्य तक्रारींचे गाऱ्हाणे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत. शहरातील सहा दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत हीच स्‍थिती असल्‍याची नाराजी नागरिकांकडून व्‍यक्‍त होत आहे.
पिंपरी येथे असलेल्‍या हवेली क्रमांक १८ आणि २६ या कार्यालयात लिफ्टची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्यांनी चढून वर जाण्याची वेळ येते. यामुळे शारीरिक अडचणींचा सामना करत नागरिक नोंदणीसाठी त्रस्त होतात. या ठिकाणी स्‍वच्‍छतागृहाची देखील योग्य सुविधा नाही. दापोडी येथे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून योग्य माहिती मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी आहेत. तासनतास वाट पाहण्याची वेळ येत आहे. यासह अनेक कार्यालयात डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळेही प्रक्रिया रखडते. नोंदणीसाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये पारदर्शकता नसल्‍याच्‍या तक्रारी नागरिकांच्‍या आहेत. नागरिकांना मूळ शुल्क किती आणि कोणत्या प्रक्रियेसाठी आहे, याची स्पष्ट माहिती दिली जात नाही. या सर्व प्रकारांमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक हैराण झाले असून, दुय्यम निबंधक कार्यालयामधील व्यवस्थापन सुधारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पारदर्शक, डिजिटल व सोईस्कर व्यवस्था लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एजंटाचा वावर, खिशाला कात्री
दुय्यम निबंधक कार्यालयातील ओळखीचे वकील तसेच एजंट यांचे बेकायदेशीर दस्त सुद्धा नोंदणी केले जातात. त्‍यांच्‍यामार्फत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्‍याच्‍या तक्रारी नागरिक करत आहेत. कार्यालयातील एजंट व अधिकारी यांचे आर्थिक लागेबांधे असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी गेलेल्या पक्षकारांना विनाकारण आर्थिक ताण सहन करावा लागत असतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व एजंटांवर कारवाई करून त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

चौकट : दुय्यम निबंधक कार्यालयात दहा दिवसात होणारी दस्‍त नोंदणी -
कार्यालय / दस्‍त नोंदणी
दापोडी - १. हवेली क्रमांक १७ / ३५७
- २. हवेली क्रमांक २५/ ६९७
पिंपरी - ३. हवेली क्रमांक १८/ ७५७
- ४. हवेली क्रमांक २६/ ४४५
निगडी - ५. हवेली क्रमांक २४/ ७९२
भोसरी - ६. हवेली क्रमांक हवेली १४ / ८९१

चौकट : या आहेत तक्रारी -
-कार्यालयातील अधिकारी दस्त नोंदणी करताना भेदभाव करतात.
-नियमबाह्य दस्त करून किंवा नियमातील दस्त असताना सुद्धा पैशाची मागणी केली जाते.
- नोंदणीसाठी एक-दोन दिवस अगोदर कळवून सुद्धा प्रत्यक्ष नोंदणीच्या दरम्यान कालावधी लागतो.
- अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत.
- नोंदणी पोर्टल सतत डाऊन असतो.
- दस्तऐवज अपलोड करताना त्रास होतो. बायोमेट्रिक किंवा फोटो घेण्याच्या यंत्रात बिघाड असतो.
- अधिकाऱ्यांचे नागरिकांशी उद्धट वर्तन.
-माहिती देण्यास टाळाटाळ.
- कोणते दस्तऐवज लागतात याची स्पष्ट माहिती मिळत नाही. अर्ज, शुल्क, स्टँप ड्यूटी याबाबत गोंधळ.


‘‘आई वडिलांना घेऊन पिंपरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो होतो. त्‍या ठिकाणी लिफ्टची सोय नाही. मोठी कसरत करून दोघांना कार्यालयात घेऊन गेलो. ज्‍येष्ठांसाठी योग्य सुविधा देणे अपेक्षित आहे.
- संतोष वाघमोडे, स्‍थानिक नागरिक, निगडी प्राधिकरण.

‘‘दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंद करण्यास गेलो होतो. तिथे मला पाच तास वाट पहावी लागली. त्‍यानंतर नोंदणी करून घेतली. या कार्यालयात स्‍वच्‍छतागृहाची सोय नाही. पिण्याचे पाणीदेखील प्यायला नव्‍हते. तसेच स्वच्‍छतेचा अभाव आहे.
- किसन फसके, स्‍थानिक नागरिक, नवी सांगवी.

‘‘गुंठेवारीबाबत नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाल्‍यामुळे दस्‍त नोंदणी लवकर होत नाही. त्‍यामध्ये काही बदल करणे आवश्‍यक आहे. सामान्‍य नागरिक शहरात दहा गुंठे जागा घेऊ शकत नाही. त्‍यामुळे नवीन परिपत्रक काढताना त्‍यांचा विचार होणे आवश्‍यक आहे. तसेच सह दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्‍यात.
- ॲड. गोरखनाथ झोळ, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन.

‘‘सध्या नवीन नियमानुसार ग्रामीण आणि शहरातील भागातील नोंदणी ऑनलाइन पद्धतीने कोठेही करता येण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्‍यामुळे नोंदणीसाठी होणारा उशीर कमी होणार आहे. तसेच नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपण फसविले जाणार नाही, याची स्‍वतः खबरदारी घ्यायला हवी. विश्‍वासू व्‍यक्‍तीकडून नोंदणीची प्रक्रिया करून घ्यावी. पिंपरीच्‍या कार्यालयात ज्‍येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधा आठवड्याभरात सुरू होणार आहे.
- सखाराम गबाले, सह दुय्यम निबंधक, हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com