दाखले प्रलंबित, वितरण ठप्प
प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले विविध दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, दाखले वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने अर्जदार अडचणीत सापडले आहेत. सध्या तब्बल दीड हजारांहून अधिक दाखले वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरवर्षी शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेशाच्या कालावधीत रहिवासी, नॉन क्रिमीलेअर, जात, उत्पन्न, विद्यार्थी दाखला यांसारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिक तहसील कार्यालयात गर्दी करतात. यंदाही तीच स्थिती आहे. मात्र, यावेळी दाखले वाटपात झालेला उशीर आणि सर्व्हरची सततची अडचण हे प्रमुख अडथळे निर्माण झाले आहेत. गेले दोन महिने पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाचा सर्व्हर वारंवार बंद पडत होता. यामुळे दाखले वाटप प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याची दुरुस्ती झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु त्यानंतर दाखले वाटपास अपेक्षित गती मिळालेली नाही. उलट अर्ज संख्या सतत वाढल्यामुळे ताण आणखी वाढत आहे. परिणामी, नागरिकांचे अर्ज प्रलंबित राहून दाखले मिळण्यास उशीर होत आहे.
तांत्रिक अडचणी सोडवल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. दाखले वाटपाचा वेग वाढवण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या आहेत. अन्यथा हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेवर दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास थांबण्याचा धोका असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, असे मत पालक व्यक्त करत आहेत.
लक्षात घेण्यासारखे मुद्दे..
- विविध वर्गांच्या प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असल्याने चिंता वाढली.
- काही पालकांनी कामावरून रजा घेत तहसील कार्यालय गाठले. पण, तिथे केवळ ‘अर्ज प्रलंबित’ अशी माहिती मिळते.
- ऑनलाइन अर्जसुद्धा अनेकदा ‘प्रोसेसिंग’ स्थितीतच अडकले आहेत.
- काही प्रकरणांमध्ये अर्ज केल्यापासून १५-२० दिवसांनंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पालकांनी उपस्थित केलेले प्रश्न
- अर्जांचा निपटारा होऊन दाखले वेळेत देण्यासाठी प्रशासन काय उपाय करणार?
- अतिरिक्त मनुष्यबळ, किंवा स्वतंत्र काउंटरची गरज आहे का?
- दाखले वाटपास होणाऱ्या उशिराला जबाबदार कोण?
- पालक, विद्यार्थ्यांना योग्य प्रतिसाद का मिळत नाही?
सर्व दाखले वाटपाची संख्या (सरासरी)
जून-जुलै महिन्यात - दिवसाकाठी ४००
इतर वेळी - दिवसाकाठी २५०
प्रलंबित असलेले दाखले
नॉन क्रिमीलेअर, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला या प्रमुख प्रकारच्या दाखल्यांची मागणी सध्या सर्वाधिक आहे.
अधिकारी भेटेनात
दाखल्यांचे वाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी घेऊन अनेक पालक अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार यांना भेटायला जातात. मात्र, चार ते पास तास थांबण्याची वेळ येत आहे. तरीही, अधिकाऱ्यांची भेट होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी लिपिकदेखील भेटत नसल्याच्या तक्रारी आहेत. पालकांचा वाढता रोष पाहता अधिकारी भेटत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
माझ्या मुलाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नॉन क्रिमीलेअर, रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिनाभर धावपळ करत होतो. तरीही दाखले वेळेत दिले नाहीत. अधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर दिवसभर भेट होत नव्हती.
- अशोक यादव, नागरिक.
सध्या दाखले वाटपाचे काम सुरळीत सुरू आहे. कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. १५ दिवसांच्या आतील मुदतीत होणाऱ्या दीड हजार दाखल्यांचे वाटप रखडले आहेत. ते देखील त्वरीत वाटप केले जातील.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
PNE25V27484
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.