अपुऱ्या दाबाने पाणी; मात्र छताला गळती
पिंपरी, ता. ३० ः गरिबांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोऱ्हाडेवाडी येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गृहप्रकल्प उभारला आहे. मात्र, तेथील रहिवाशांना छतामधून पाणी गळती, नळाला अपुऱ्या दाबाने पुरवठा यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या निदर्शनास आणून देखील महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना माफक दरात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे टोलेजंग गृहप्रकल्प बांधला. महापालिका प्रशासनाने स्वप्नपूर्ती हाउसिंग सोसायटीची स्थापना करुन हस्तांतरण प्रक्रिया पार पाडली. तरीही, काही महत्वाच्या बाबींची पूर्तता केली नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. परिणामी, या प्रकल्पातील १ हजार २८८ सदनिकांमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन ते चार हजार नागरिकांना दररोज वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच सोसायटी हस्तांतरण करण्यापूर्वी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. सोसायटी स्थापनेनंतर एक वर्ष सोसायटीचा व्यवस्थापन खर्च महापालिकेने करण्याचे ठरले असताना प्रशासन हात झटकत आहे.
काय आहेत तक्रारी ?
- नळाला पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने मोठी गैरसोय
- पाण्याच्या टाकीवर संरक्षक जाळी अथवा कठडे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर
- टाक्यांमधील पाणी गळतीमुळे जास्त वेळ पाणी साठा टिकत नाही
- काही रहिवाशांच्या घराच्या छताला आतील भागात गळती सुरू, भिंतींना तडे
- निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे फरशा, खिडक्यांच्या काचा फुटल्या
- सोसायटीच्या बाहेर रस्ता असल्यामुळे गतिरोधकाची मागणी, मात्र त्याकडे दुर्लक्ष
- गृह प्रकल्पातील सर्व इमारतींना विद्युत पुरवठ्यासाठी योग्य प्रकारे अर्थिंग दिलेली नाही. विद्युत खांबांवरील वीजजोड अर्धवट स्थितीत
- सांस्कृतिक भवनाची उच्चदाबाची विजेची तार उघडी
- बी आणि सी इमारतीच्या बाजूलाच पावसाचे पाणी जमा
- ए, बी, सी, विंगकडील बाजू उताराची, पाऊस पडताच उद्यानाची माती वाहून जाण्याचा प्रकार
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
- सौरउर्जा वीज मीटर बसवावेत
- सौरउर्जा पॅनल पूर्ण क्षमतेने चालू करावेत, त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी
- एसटीपीचे आऊटलेट काढण्यात यावे, सुरक्षा भिंत बांधावी
- एसटीपीच्या परिसरात ब्लॉक बसवावेत, लिफ्टचा विमा काढला जावा
- मुख्य प्रवेशद्वारावर स्वयंचलित असावे, सांस्कृतिक भवनसाठी वीज, पाणी पुरवठा हवा
- उद्यानात पाणी सोडण्यासाठी नळजोड द्यावेत
- अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवावे
सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला तरी महापालिका प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विचारणा केली. सध्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी सुरू केली आहे.
- तुषार थोरात, अध्यक्ष, स्वप्नपूर्ती गृहरचना संस्था, बोऱ्हाडेवाडी
कागदपत्रांअभावी काही मोजक्या लाभार्थ्यांना घरांचा ताबा देणे बाकी आहे. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली जात आहे. सर्व घरांचा ताबा दिल्यानंतर बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल. तांत्रिक कारणांअभावी काही कामे राहिली असतील; तर ती पूर्ण केली जातील.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.