ताथवडे परिसरालाही कोंडीचे ग्रहण ! अरुंद भुयारी मार्ग, खराब सेवा रस्त्यांमुळे वाहनचालक हैराण
कोंडी वाहतुकीची
अन् चालकांचीही
भाग - १
पावसामुळे पडलेले खड्डे, खराब सेवा रस्ते, स्टॉर्म वॉटर लाइन नसल्याने सतत साठणारे पाणी व डीपी रस्त्याचे रखडलेले काम.. गेल्या कित्येक वर्षापासून कात्रज - देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ताथवडे भुयारी मार्गालगत ही परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथील सेवा रस्ते व ताथवडे भुयारी मार्गाची गेल्या कित्येक वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.
अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ ः पुनावळेतील भुयारी मार्गाप्रमाणेच ताथवडे भुयारी मार्ग हा येथील वाहतूक कोंडीचे केंद्र ठरला आहे. भुयारी गटारांअभावी या मार्गामध्ये वाहून येणारे सांडपाणी, खराब सेवा रस्ते, अरुंद भुयारी मार्ग, व भुयारी मार्गालगत पडलेले खड्डेच खड्डे यामुळे येथे बाराही महिने वाहतूक कोंडी होत असते. शहरातून हिंजवडीकडे जाणारे आयटी कर्मचारी, या भागातील शाळा महाविद्यालयात ये - जा करणारे विद्यार्थी व येथे राहणारे नागरिक यांना येथील रस्त्यांच्या परिस्थितीमुळे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अपघाताचा धोका
रावेत ते वाकड दरम्यानच्या सेवा रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः चाळण झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले रस्ता रुंदीकरण अद्यापही सुरू झालेले नसल्याने या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली गेली. मात्र, ताथवडेतील सेवा रस्त्यांची डागडुजी झालीच नाही. परिणामी, या वर्षी पावसाळ्यात येथील सेवा रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रखडलेली कामे
अरुंद व खड्डेमय भुयारी मार्गामुळे ताथवडेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या भागातील ताथवडे बीआरटी मार्गाकडून या भुयारी मार्गाकडे येणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. दुसरीकडे भुयारी मार्गाच्या तोंडाजवळच अनेक खड्डे पडलेले आहेत. या भुयारी मार्गालगत स्ट्रर्म वॉटर लाइनचे कामही गेल्या महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामांमुळे येथील कोंडीत भर पडत आहे.
‘‘दोनच दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीसमोर एका महिलेला डंपरने धडक दिल्याने तिला तिचा पाय गमवावा लागला. खराब रस्त्यांमुळे व अवजड वाहतुकीमुळे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना दुचाकीवर बाहेर घेऊन जातानाही भीती वाटते. मुख्यतः सेवा रस्त्यांचे काम होणे गरजेचे आहे.’
- अश्विनी जोगदंड, महिला कर्मचारी
‘‘अरुंद भुयारी मार्ग आणि त्यामध्ये साठणारे पाणी यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. वाहनचालकही अनेकदा बेशिस्तरीत्या वाहने चालवत असतात. गेल्या कित्येक वर्षांमध्ये येथील रस्त्याचे दुरुस्ती काम झालेले नाही. महिनाभरापासून पाइप लाईन टाकण्याचे काम सुरू होते तेही पूर्ण झालेले नाही.’
- अरुण अडसूळ, स्थानिक रहिवासी
‘ स्टॉर्म वॉटर लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतरच हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. अद्यापही येथे खोदकाम सुरू असेल तर तेही पूर्ण केले जाईल. अशोक नगर येथील भूसंपादनाचे काम रखडल्यामुळे येथील रस्त्याचे काम थांबलेले आहे.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, स्थापत्य विभाग
फोटोः 27962
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.