माय फ्रेंड श्रीगणेशा एक

माय फ्रेंड श्रीगणेशा एक

Published on

माय फ्रेंड श्रीगणेशा ः एक ः पीतांबर लोहार
--
श्रीगणेशा

हरि, जय जय रामकृष्णहरि।
हरि, जय जय रामकृष्णहरि।
रामकृष्णहरि।
जय जय रामकृष्णहरि।
‘रामकृष्णहरि’ नामजप कानी पडला आणि मन व पावले आवाज येणाऱ्या मंडपाच्या दिशेने वळाली. ध्वनिक्षेपकावरून ‘रामकृष्णहरि’ भजन ऐकू येत होते. त्यासोबत टाळ आणि मुदंगाचा नादही होता. भजन चालू असावे, म्हणून मंडपाच्या प्रवेशद्वारातून आत पाहिले. एक वारकरी साधक हाती वीणा घेऊन ‘रामकृष्णहरि’ भजन गात होते. त्यांच्या मागोमाग अन्य टाळकरी साधक गायनाची साथ देत होते. शेजारीच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपातील ती सुंदर गणेशमूर्ती होती. डोईवर फेटा घातलेला. प्रसन्न मुद्रा. हाती मोदक. समोर श्रीमद्‍भगवद्‍गीतेचे माउलींनी निरूपण केलेला भावार्थदीपिका अर्थात श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला होता. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. दिवस होता, भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात श्रीगणेश चतुर्थी. सार्वजनिक गणेशोत्सवाचा पहिला दिवस. आणि ठिकाण होते, श्रीक्षेत्र आळंदी देवाची. संत ज्ञानेश्‍वर माउलींची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र. इंद्रायणी नदीकाठचा परिसर. प्रशस्त घाट. त्यावर घातलेला मोठा मंडप. आणि त्यात सुरू असलेले ‘जय जय रामकृष्णहरि...।’ भजन. अधिक माहिती घेतल्यानंतर कळाले की, सार्वजनिक गणेशोत्सव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली यांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवाचा योग साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने माउलींच्याच रूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सवानिमित्त पुढील दहा दिवस अर्थात गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच गणपतीच्या आगमनाच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थीच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन केले आहे. त्याचाच प्रारंभ आता होणार होता. त्यासाठी पंचपदीची सुरुवात विणेकरी व वारकरी साधकांनी केली होती. वारकरी संप्रदायाचा नाममंत्र ‘हरि, जय जय रामकृष्णहरि।’ भजन गायनाला सुरुवात केली होती. योगायोगाने आज ते कीर्तन श्रवणाची संधी श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मिळाली होती. हा योग साधल्या जाण्याचे कारण होते, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्याचा. त्या शेजारील सिद्धेश्वराचे, पूर्वाभिमुख गणरायाचे, संत एकनाथ महाराजांनी ध्यान केलेल्या नाथपाराचे आणि माउलींच्या मातोश्रींनी सहस्त्र प्रदक्षिणा घातलेल्या सुवर्ण पिंपळाच्या दर्शनाचे. त्यासाठी सकाळीच घरातून निघून संजीवन समाधी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती. महाद्वारातून आत प्रवेश करण्यापूर्वी पायरीचे दर्शन घेतले. भजनी मंडपाच्या बाहेर साष्टांग दंडवत घातला. नाथ पाराचे दर्शन घेऊन गणरायाच्या दर्शनाला गेलो. तेथूनच माउलींच्या समाधी मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले. (आता माउलींच्या जन्मदिनी अर्थात गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुवर्णकळसाची प्रतिष्ठापना मंदिराच्या शिखरावर केली आहे.) कळसाचे दर्शन घेऊन ‘शेंदूर लाल चढायो’ असे वर्णन असलेल्या पूर्वाभिमुख गणरायाचे दर्शन घेतले. दर्शन बारीत थांबून हळूहळू पुढे सरकत माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आलो. त्यानंतर आदिशक्ती संत मुक्ताबाईंचे दर्शन घेऊन ‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्‍वर।।’ असे संत नामदेव महाराज यांनी वर्णन केलेल्या सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. तेथून बाहेर आल्यानंतर अजान वृक्षाचे दर्शन घेऊन सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा पूर्ण केली आणि महाद्वारातून बाहेर पडलो. शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदी घाटावरील प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घ्यावा म्हणून घाटावर आलो. दुथडी भरून इंद्रायणी वाहत होती. तिच्या पात्रात अर्थात घाटाच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन पाय धुतले. जलतीर्थाचे दोन थेंब डोक्यावर टाकून डोळ्यांना लावले. सकाळी सकाळी माउलींचे, गणरायाचे आणि सिद्धेश्‍वराचे दर्शन झाल्यामुळे मन समाधानी झाले होते. आता घराकडे परतून घरच्या गणरायाची प्रतिष्ठापना करावी, या विचाराने परतण्याचा विचार केला. तेव्हढ्यात ‘हरि, जय जय रामकृष्णहरि।’ भजनाने लक्ष वेधले, गोड आवाजाने ध्यान आकर्षित केले आणि घराकडे वळण्याऐवजी पावले भजन सुरू असलेल्या नदी घाटावरील मंडपाकडे वळले. तेथील वातावरण अधिकच प्रसन्न होते. सुंदर अशी आरास करून माउलींच्या रूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. त्यानिमित्त कीर्तनाचे आयोजन केले होते. त्याचा प्रारंभ होणार होता. म्हणूनच वारकरी साधकाने हाती वीणा घेऊन ‘हरि, जय जय
रामकृष्णहरि।’ नामस्मरणाला प्रारंभ केला. त्यांच्या मागे ओळीत उभे असलेले साधकही ‘हरि, जय जय रामकृष्णहरि।’ म्हणत भजनात तल्लीन झाले होते. शेजारी केलेल्या सजावटीमध्ये विराजमान माउलींच्या रूपातील गणराय प्रसन्नमुद्रेने हे सारे पाहात होते. ऐकत होते. कदाचित मनात म्हणत असावेत, कीर्तनकार आता कोणत्या अभंगाचे निरूपण करणार. कारण, सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झालेला होता. विधिवत पूजन करून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. धुपाचा दरवळ सर्वत्र पसरला होता. पूजेची थाळी समोरच होती. एका बाजूला कळस ठेवला होता. मोदकाचे ताट भरलेले होते. दीपप्रज्ज्वलन करून त्याभोवती फुलांची आरास केली होती. गणरायाच्या हाती दूर्वा होत्या. समोर हळदी-कुंकवाचा करवंडा होता. श्रीफळ, सुपारी, वस्त्र, अक्षता, कापूर, अत्तर बाजूलाच होते. दूध, दही, तूप, मध, साखर अशा पदार्थांपासून पंचामृत बनवलेले होते. ‘हरि, जय जय रामकृष्णहरि।’च्या माध्यमातून पंचपदी सुरू झाली होती. कीर्तनकार महाराज कोणता अभंग गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेतात आणि त्याचे कसे निरूपण करतात, हे ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com