मावळचे खंबीर आधारवड 'कृष्णराव भेगडे'

मावळचे खंबीर आधारवड 'कृष्णराव भेगडे'
Updated on

मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे आणि हजारोंच्या जीवनात दीपस्तंभासारखे प्रकाश टाकणारे मावळभूषण शिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय ८९) यांचे सोमवार, ३० जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने खंबीर आधारवड हरपला आहे.
- संतोष खांडगे, सचिव, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे

मावळ तालुक्यात शिक्षणाची गंगा आणणारे, अंधारात भरकटणाऱ्या पिढ्यांना उजेडाचा मार्ग दाखवणारे आणि ‘शिक्षण’ हेच खरे परिवर्तनाचे माध्यम आहे, या तत्त्वावर ठाम राहून कार्य करणारे केवळ राजकीय नेते नव्हेत तर मावळच्या शैक्षणिक पुनर्जागरणाचे शिल्पकार म्हणजे कृष्णराव भेगडे होते. शिक्षण हेच खरी समृद्धी त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. जनसंघातून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी दोन वेळा विधानसभेचे व दोन वेळा विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व केले.

राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजकारण आणि लोकसेवेचे माध्यम असावे याची शिकवण त्यांनी त्यांच्या कार्यातून सतत दिली. समाजासाठी काहीतरी चिरस्थायी कार्य करण्याचे व्रत घेत दूरदृष्टीच्या लोकहिताय ध्येयाने भारलेले अजातशत्रू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
बहुजन हितायक विचारसरणी असल्याने त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कामाला मोठे यश आणि भक्कम जनाधार प्राप्त झाला होता. शिक्षण क्षेत्र हा त्यांच्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय. राजकारणातील निवृत्तीनंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी पूर्ण वेळ स्वतःला वाहून घेतले होते.

आज मावळातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणासह कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कौशल्य विकास अशा उच्च शैक्षणिक संस्थांच्या विकासाचा मार्ग गरुड भरारी घेत आहे. त्याचे सर्व श्रेय भेगडे साहेबांनाच जाते. काळाबरोबर पुढे जाण्याची दूरदृष्टी आणि त्यासाठी केलेले तळमळीचे प्रयत्न, कधीच विसरता जाणार नाही.

मावळातील ग्रामीण भागातील घराघरांत विद्येची शिदोरी पोहचविण्यात भेगडे साहेबांचा वाटा सिंहाचा आहे. ते खऱ्या अर्थाने मावळचे शिक्षण महर्षी होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा सर्वांना परिचित आहे. काळाची गरज ओळखून भेगडे साहेबांनी या संस्थेच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या आयामाला दैदीप्यमान परिमाण प्राप्त करून दिले आहे. एज्युकेशन विश्वातील ‘नूतन’ नावाचा संस्थेचा ब्रँड प्रस्थापित झाला आहे.

इंद्रायणी विद्यामंदिर या संस्थेत देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रव्यवस्थापन, फार्मसी आणि विज्ञानाच्या दर्जेदार सुविधांचा व शिक्षणाचा पाया मजबूत केला आहे. प्रबोधन आणि कुशलताप्रवण उपक्रमांत त्यांचा सर्व शिक्षण संस्थांचा मोठा नावलौकिक प्राप्त झाला आहे. पक्ष, राजकारण, जात धर्म या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वांना बरोबरीने घेत ही किमया साधली आहे. मावळ भूषण मामासाहेब खांडगे, माजी आमदार बाळासाहेब बारमुख, कै. ॲड. दादासाहेब परांजपे, कै. दादासाहेब किबे, कै. केशवराव वाडेकर, कै. दादासाहेब ढोरे, कै. वसंतदादा खांडगे, कै. आण्णासाहेब शेलार, कै. सुरेशभाई शहा, कै. मुकुंदराव खळदे, अशा विविध क्षेत्रातील जाणत्या लोकांना एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित करून त्यांच्या सहकार्याने मावळचे शैक्षणिक जगतात साहेबांनी रचलेला पाया आणि कळस हा क्रांतिकारक आहे.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून खऱ्या अर्थानी नावारुपाला भेगडे साहेबांनी आणली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संस्थेने पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांशी सामंज्यस करार केलेले आहेत. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक, सहा माध्यमिक विद्यालये, एक सीबीएससी इंग्रजी माध्यमाची मामासाहेब खांडगे शाळा, सात ज्युनियर कॉलेज, दोन इंजिनिअरिंग कॉलेज, अशा विविध २० शाखा असलेले हे विद्येचे मंदिर भेगडे साहेबांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचे प्रतिफल आहे.

आपले शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे. परंतु परिसरातील औद्योगिक व्यवसाय परिवर्तनाचा वेध घेत ते स्थानिक गरजांची पूर्तता करणारे देखील असावे म्हणून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ त्यांनी नूतनच्या माध्यमातून रचली.

२१ व्या शतकातील आव्हाणांना सामोरे जाताना साहेबांचे मार्गदर्शन, त्यांचे विचार, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे संस्कार आणि लोकहिताला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची प्रेरणा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये भेगडे साहेबांनी रुजवली. त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे केवळ रस्ते व पूल नव्हते, तर शिक्षण, आरोग्य, शेती, सहकार आणि उद्योग, सामाजिक समरसता यांचा समतोल विकास हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, वसतिगृहे आणि सहकारी संस्था स्थापण्याचा ध्यास घेतला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही सेवा नव्हे तर अधिकार आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

‘माणूस घडवण’ हे त्यांचे प्रमुख कार्य होते. त्यांनी हजारो तरुणांना नेतृत्व शिक्षण समाजसेवा आणि सार्वजनिक कार्यामध्ये प्रेरणा दिली. भेगडे साहेबांचे व्यक्तिमत्व शांत व संयमी पण ठाम होते. त्यांचे बोलणे नेहमी प्रभावी असे. त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमीच शिस्त, सत्यता आणि जनतेच्या सेवेत निष्ठा या मूल्यांची शिकवण दिली. त्यांचा प्रत्येक निर्णय लोकहिताचा असे. राजकारणात राहूनही ते मत, पक्ष व सत्तेपेक्षा समाजाच्या कल्याणाला प्राधान्य देणारे होते.

सत्तेत असूनही नम्रपणे सेवेत राहून निरलस, तुमच कार्य हे अमर व अलौकिक खास। जन्म झाला समाजासाठी, झिजले तुम्ही लोककल्याणासाठी, तुम्ही आमचे नेते नव्हे तर होता आमचा आधार, प्रेरणा आणि आराध्य वडीलधारा। आज मावळ उभा आहे. अश्रूंनी डोळे भरून आणि आठवणींनी मन ओथंबून...

भेगडे साहेबां आयुष्य हे एक विद्यापीठ होते. ज्यातून प्रत्येक पिढीला शिकायला मिळाले. त्यांनी दिलेल्या शिकवणीवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल. त्यांचे कार्य, विचार, मूल्ये आणि ध्येयधोरणे मावळच्या पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. मावळचे नशीब घडवणाऱ्या या ‘शिक्षण महर्षी’, ‘मावळ भूषण’ आणि ‘धुरंधर नेत्यास’ भावपूर्ण श्रद्धांजली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com