शहरालाच कोंडीचा विळखा
पिंपरी, ता. ८ ः पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहनचालक, पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी किंवा कडेने चालण्यासाठी असुरक्षितता आणि काही ठिकाणी सुरू असलेली रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची कामे आदी कारणांमुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या आणि ‘सकाळ’ने निरीक्षण केलेल्या शहरातील आठ प्रमुख रस्त्यांवरील २१ ठिकाणांची वस्तुस्थिती सोमवारी (ता. ७) सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजता ‘सकाळ’ने जाणून घेतली. त्यामध्ये कोंडीची अनेक कारणे समोर आली असून, ती सोडविण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, याची वास्तवता दिसून आली.
मुंबई-पुणे महामार्गाचे निगडी ते दापोडी दरम्यान आठ पदरीकरण झाले आहे. पिंपरी, चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ चौक अशा तीन ठिकाणी ग्रेडसेपरेटर आहे. नाशिक फाटा चौक, टिळक चौक व भक्तीशक्ती चौक निगडी येथे उड्डाणपूल आहेत. शिवाय, अन्य रस्तेही प्रशस्त आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वंच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शिवाय, महापालिकेकडून पिंपळे निलख येथील रक्षक चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. चऱ्होली, चिखली, मोशी, तळवडे, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे या समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, वाढलेली वाहनांची संख्या व बेशिस्त वाहनचालक यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यात पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवारस्ते व पदपथांचा अभाव यांच्यामुळेही कोंडीत भर पडते. वाकड येथील भुमकर चौकातील भुयारी मार्ग खूपच अरुंद असल्याने व आजूबाजूचे रस्ते रुंद असल्याने चौकात ‘बॉटलनेक’ निर्माण झाला आहे. शिवाय, वारंवार पाणी साचून खड्डेही पडले आहेत. परिणामी वाहनांचा वेग मंदावून कोंडीत आणखी भर पडते.
वाकड येथील मानकर चौकात सिग्नल तोडणे, खड्डे आणि रस्त्याचे काम यांमुळे रोजच अपघाताची भीती वाटते. बीआरटीमध्ये चारचाकी गाड्या येतात. सर्रासपणे नियम मोडले जातात. यामुळे आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
- रमेश चौधरी, वाहनचालक आयटी कंपनी
असाही अनुभव
पुणे-नाशिक महामार्ग आणि देहू-आळंदी रस्त्यावर मोशी येथे भारतमाता चौक आहे. सोमवारी सायंकाळी एक पोलिस उपनिरीक्षक, एक पोलिस आणि दोन वॉर्डन वाहतूक नियमनाचे काम करत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चारही दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक रुग्णवाहिका उलट दिशेने वाट काढत आली आणि भोसरीकडे गेली. तर दुसरी रुग्णवाहिका मोशीकडून येऊन चिखलीकडे गेली. त्यांना वाट काढून देताना पोलिसांना कसरत करावी लागली. दरम्यान, सर्वच बाजूने आणखी वाहने येत असल्याचे पोलिसांनी गुगुलवर बघितले. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडणार होती. सिग्नल यंत्रणा सुरू होती. मात्र, रहदारी आटोक्यात येण्याची शक्यता नसल्याने पोलिसांच्या व्हॉटस्ॲपवर वरिष्ठांचा संदेश आला की, ‘सिग्नल बंद करून, स्वतः वाहतूक मोकळी करा’. त्यांच्या मदतीला फिरते पथकही आले. त्यात तीन कर्मचारी व दोन वॉर्डन होते. आठच्या सुमारास सिग्नल बंद करून पोलिस व वॉर्डन यांनी चौकात चारही बाजूला थांबून वाहतूक मोकळी करण्यास सुरुवात केली. साधारण, साडेआठच्या सुमारास बऱ्यापैकी रहदारी सुरळीत झाली.
‘जय हिंद सर...’
पुणे-नाशिक महामार्गाने मोशी गावाकडून आलेली एक स्कूटर भारत माता चौकातून चिखलीकडे वळली. त्यावर पुढे पाच-सहा वर्षांची मुलगी उभी होती. तिने वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना ‘जय हिंद सर’ म्हटले. तिलाही ‘जय हिंद’ म्हणत अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. त्यावरून लहान मुलांमध्ये पोलिसांविषयीचा आदर दिसून आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.