मोशी प्रदर्शन केंद्र उद्योग विस्ताराचे जागतिक महाद्वार दरवर्षी १५ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन ः स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळतेय चालना
पिंपरी, ता. १० ः पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योजकांसाठी मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्यापार केंद्र (पीआयईसीसी) हे अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. उद्योजकांनी उत्पादन केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूंना येथे हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत असून, या केंद्रामुळे स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळत आहे. तसेच, नवीन संशोधनासोबतच उद्योजक घडवले जात आहेत. दरवर्षी सुमारे १५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने येथे आयोजित केली जातात. यामध्ये औद्योगिक, बांधकाम आणि कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे, यंत्रसामग्री व उत्पादने मांडली जातात. व्यवसाय ते व्यवसाय आणि व्यवसाय ते ग्राहक यांच्यासाठी हे केंद्र जागतिक दर्जाचे महाद्वार ठरत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत विकसित होत असलेल्या ‘पीआयईसीसी’चा विस्तार ९४.८७ हेक्टरचा आहे. यातील २०.११ हेक्टर जागा खुल्या प्रदर्शनासाठी विकसित करण्यात आली आहे. हे केंद्र व्यवसाय ते व्यवसाय (बी२बी) आणि व्यवसाय ते ग्राहक (बी२सी) संवादासाठी एक मुक्त व्यासपीठ मानले जाते. येथे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, लष्कराचे शस्त्रास्त्र प्रदर्शन, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यक्रम, ऑटोमोबाईल, प्लास्टो, कन्स्ट्रो आणि फ्युचर मार्केट यांसारखी महत्त्वपूर्ण प्रदर्शने भरविली जातात. पावसाळ्यातील चार महिने वगळता, ऑक्टोबर ते जानेवारी आणि फेब्रुवारी ते मे या कालावधीत प्रदर्शने आयोजित करण्यास परवानगी दिली जाते. यामुळे ‘पीएमआरडीए’ला मोठा महसूल मिळत असतानाच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योगजगतातील नवउद्योजकांना स्वतःचे उत्पादन सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
आर्थिक, सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण
मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्यापार केंद्र पर्यावरण सुसंगत पद्धतीने विकसित केले जात आहे. हे केंद्र स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. उद्योगांचे उत्पादन, व्यापार आणि निर्यात वाढवण्यास फायदेशीर असलेल्या या प्रदर्शनामुळे परिसराचा आर्थिक स्तर उंचावत चालला आहे. त्यामुळे हे केंद्र केवळ व्यावसायिक नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरत आहे.
प्रदर्शन केंद्रात काय ?
- एक लाख ५ हजार चौरस मीटर जागेवर झाकलेले प्रदर्शन केंद्र.
- ९८ हजार चौरस मीटर जागेवर खुले प्रदर्शन.
- ६७९२ मोटारी व ५९२ ट्रक पार्किंगची व्यवस्था.
- सुसज्ज हेलिपॅड.
----------
प्रदर्शन केंद्राचा उद्देश
- विविध उद्योगांसाठी एक वैश्विक व्यासपीठ.
- आर्थिक विकास व स्थानिक उत्पादकांना जागतिक मान्यता मिळवून देणे.
- रोजगार निर्मितीसाठी सक्षम पर्याय देणे.
- स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणे.
--------
आजपर्यंतची प्रदर्शने
- प्रदर्शनाचा प्रारंभ ः २०१८
- दरवर्षी भरविण्यात येणारी प्रदर्शने ः १२ ते १५
- आजपर्यंत भरविण्यात आलेली प्रदर्शने ः सुमारे ६०
- औद्योगिक, कृषी, लष्कर व बांधकाम क्षेत्राचा सहभाग
‘‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार केंद्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने एकाच छताखाली आणली जातात. उद्योग विस्ताराबरोबरच ग्राहक केंद्रित प्रदर्शन केंद्राचा पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातीलच नव्हे तर देशभरातील उद्योजकांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध आहे. याचा फायदा उद्योजकांसह ग्राहकांनासुद्धा होत आहे. भविष्यात यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे.
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.