दुर्दशा, दाही दिशा ते ‘दिशा’
पिंपरी, ता. २६ : ‘माझा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. टवाळखोरांच्या नादी लागून गुन्हे करू लागला. त्याची गैरकृत्ये आमच्यासाठी धक्कादायक होती. त्याची दुर्दशा झालीच, पण आमचे कुटुंब दाही दिशा भरकटू लागले. अशावेळी खाकी वर्दीतील माणूसकीमुळे साकारलेल्या ‘दिशा’मुळे आमचा मुलगा आणि त्याच्यासह आम्ही तरलो. समुपदेशन, मार्गदर्शनाशिवाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही तो घेऊ शकेल. त्यामुळे तो प्रशिक्षित, सुशिक्षित बनण्याच्या मार्गावर असून लवकरच रोजगारही कमवू लागेल...’
शरदचे (नाव बदलले आहे) वडील सांगत होते. त्यांचा मुलगा आता अकरावीत शिकतो. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. अशा अनेक ‘शरद’ची व्यथा यशोगाथा बनण्याच्या मार्गावर आहे. विधिसंघर्षित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ‘दिशा’ उपक्रमामुळे हे शक्य होत आहे.
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, कुसंगत, व्यसन, झटपट पैशांचा हव्यास अशा कारणांमुळे अल्पवयीन मुले शिक्षण सोडून गुन्हेगारीकडे वळतात. हे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सामील असल्याचे दिसते. ‘दिशा’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्तालय स्तरावर विशेष बाल पथक स्थापन झाले आहे. त्या अंतर्गत एक समितीही स्थापन झाली आहे. यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक, व्यसनमुक्ती तज्ज्ञ, शिक्षण समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक यांचा समावेश आहे.
विशेष बाल पथक व समिती यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जातात. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, व्यसन तसेच गुन्हेगारीपासून त्यांना रोखणे आदी उपक्रम राबविले जातात. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना त्यातून होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली जाते. त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांची आवड पाहून त्या पद्धतीने त्यांना विविध माध्यमांतून संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देऊन शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले जाते.
----------------
गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे पथक झटत असते. मुलांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण दिले जाते. उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. ‘दिशा’ उपक्रमातून अनेक मुले सन्मार्गाला लागली आहेत. पालकांनी आपल्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही मदत हवी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, विशेष बाल पथक
------------------------------------
या वर्षी राबविलेले उपक्रम
जनजागृतीपर कार्यक्रम ः ४८
शाळेत पुन्हा प्रवेश मिळवून दिलेली मुले ः २३
व्यसनमुक्त केलेली मुले ः ७
समुपदेशन ः १९२
------------------
फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
विधिसंघर्षित मुलांमध्ये संघभावना निर्माण करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आयुक्तालय स्तरावर फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४०९ मुलांचे ३२ संघ तयार करण्यात आले. त्यांना विविध कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) फुटबॉलचे साहित्य आणि व बूट उपलब्ध करून दिले. या स्पर्धेत पिंपरी पोलिस ठाण्याच्या संघाने जेतेपद पटकावले. देहूरोड ठाण्याच्या संघाने द्वितीय, तर चिखली ठाण्याच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व खेळाडूंचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कौतुक केले.
-----------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.