महापालिका प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

महापालिका प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

Published on

पिंपरी, ता. २८ ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने प्रारुप प्रभाग रचना सुरू केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून नियोजित वेळेत एक ते पाच ऑगस्ट या कालावधीत प्रारुप राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना केली जाईल. मात्र, प्रभाग रचना कशी असेल? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
महापालिकेची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या लोकनियुक्त कारभाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या घडामोडी व इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण यामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी, राज्य सरकारने महापालिका आयुक्तांची १४ मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश महापालिका निवडणूक विभागाला दिला आहे. त्याप्रमाणे काम सुरू असून २०११ च्या जनगणनेनुसार असलेली लोकसंख्या अधिकृत धरली आहे. प्रगणक गटाची मांडणी (ब्लॉक), स्थळ पाहणी केल्यानंतर गुगल मॅपच्या आधारे आणि प्रत्यक्ष हद्दीची पाहणी करून प्रभागाचे नकाशे तयार केले आहेत.

दृष्टिक्षेपात प्रभाग रचना
- २०११ च्या जनगणनेनुसार १७,२९,३५९ लोकसंख्या
- १ जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार
- सद्यस्थितीत १७ लाख ७५१ मतदार
- ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असतील
- एका प्रभागात ४९ हजार ते ५९ हजार मतदार असणार

अशी झाली तयारी
- ११ ते १६ जून ः प्रगणक गटाची (ब्लॉक) मांडणी
- १९ जून ते ४ जुलै ः प्रत्यक्ष स्थळपाहणी
- ५ ते १० जुलै ः गुगल मॅप आधारे नकाशे तयार
- ११ ते २४ जुलै ः नकाशावर नमूद प्रभाग हद्दीची जागेवर जाऊन तपासणी

ऑक्टोबरमध्ये अंतिम रचना
- २२ ऑगस्ट ः निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त प्रभाग रचना प्रसिद्ध करणार
- २२ ते २८ ऑगस्ट ः प्रभाग रचनेवर हरकती, सूचना मागविणार
- २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर ः हरकतींवर सुनावणी होणार
- ३ ते ६ ऑक्टोबर ः राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रसिद्ध करणार

शुक्रवार किंवा सोमवारी प्रारूप ?
प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांना ३१ जुलैपर्यंत स्वाक्षऱ्या करायच्या आहेत. एक ते पाच ऑगस्ट या कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा राज्याच्या नगर विकास विभागाला सादर केला जाईल. मात्र, दोन व तीन ऑगस्ट रोजी शनिवार व रविवार आहे. त्यामुळे कामकाजाच्या दिवशी शुक्रवार (ता. १), सोमवार (ता. ४) किंवा मंगळवारी (ता. ५) प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. सध्या अंतिम टप्प्यात काम आहे. गुगल मॅपच्या आधारे प्रभागांचे नकाशे तयार केले आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाला प्रारूप सादर केले जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर जाहीर करून हरकती व सूचना मागवून सुनावणी घेतली जाईल.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com