
पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ व उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दोन ऑगस्टला २०११ पूर्वीपासून शासकीय जागेवर रहिवासी अतिक्रमण असलेल्या पात्र कुटुंबांना अतिक्रमण नियमानुकूल करून जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येणार आहे. तीन ऑगस्टला निरगुडी व माळीनगर येथे पाणंद रस्ते आणि शिवरस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. चार ऑगस्टला पिंपरी डिलक्स चौकातील चिंचवड मंडळ, भोसरी मंडळाच्या वतीने भोसरीतील कोकण मराठा महासंघ, मोशी मंडळच्या वतीने मोशीतील साधूराम गार्डन मंगल कार्यालय, देहू मंडळाच्या वतीने देहूगाव तलाठी कार्यालय येथे अभियान राबविले जाणार आहे. पाच ऑगस्टला रहाटणीत विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण अनुदान वाटप होणार आहे. सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासीत करणे व ते अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे. सात ऑगस्टला अपर तहसील कार्यालय पिंपरी नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ हे दोन्ही कार्यक्रम निगडी येथील कार्यालयात होणार आहे.
‘‘महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार महसूल सप्ताहाचे आयोजन केले आहे. नागरिकांना या सप्ताहात सहभागी होऊन शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या योजनेतून विविध उपक्रम राबविण्यात येतील,’’ असे आवाहन अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी केले.
---