
पिंपरी, ता. १ : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१ व १५ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ५७ सेवा अधिसूचित केल्या आहेत. त्या ९४ नागरी सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पुरविल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसीय महत्त्वाकांक्षी कृती आराखड्याचा अनुषंगाने या सेवांचा लाभ नागरिकांनी थेट ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. यासाठी नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
नागरी सुविधा केंद्रांमार्फत सेवांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांनी सर्वप्रथम स्वतःचे खाते तयार करायचे आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागेल, यामध्ये ओटीपीद्वारे नागरिकाचा मोबाईल क्रमांक तपासून संग्रही केला जाईल. खात्यामध्ये नागरिकांनी लॉग-इन केल्यानंतर संबंधित सुविधेला नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑनलाइन सेवेसाठी नागरिकांना ५० रुपये शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, नागरी सुविधा केंद्रामार्फत लाभ घेण्यासाठी ५० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. रक्कम भरल्यास ती प्राप्त झाल्याबाबत नागरिकांना एसएमएसद्वारे कळेल. अर्ज यशस्वीरित्या महापालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर त्या अर्ज क्रमांकाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. तो अधिक तपासणीसाठी महत्त्वाचा असेल. एखाद्या सशुल्क सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतानाच सेवेची पूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून देणारा अंतिम दाखला ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून घेण्यास उपलब्ध केला जाणार आहे.
नागरी सुविधा केंद्राद्वारे प्रक्रिया झालेले अर्ज
(एप्रिल २०२४ ते मार्च २५)
- अर्ज : ७७, ७७३
- शुल्क : १८७.५८ कोटी
(एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत)
- अर्ज : २३,३८३
- शुल्क जमा : ४२.१५ कोटी
नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणे आणि शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे. याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवाहमी कायद्यांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या ५७ सेवा १०० टक्के ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. ज्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
......