

मद्य, खंडणीसाठी विक्रेत्याला मारहाण
पिंपरी : फुकटचे मद्य आणि महिन्याला दोन हजार रुपये खंडणी देण्यासाठी मद्य विक्रेत्याला मारहाण केली. ही घटना मौजे निघोजे, ता. खेड येथील मद्यविक्री दुकानासमोर मंगळवारी (ता. ८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यवस्थापक आनंद शर्मा (वय २१, रा. निघोजे) यास आरोपी रामदास हनपुडे (वय ३८) याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. कोयता हवेत फिरवून नागरिकांना धमकी दिली. याविरोधात फिर्यादीने महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
कागदपत्रांचा गैरवापर; जामीनदार बनवून फसवणूक
पिंपरी : आधारकार्ड, वीजबिल व पॅनकार्डच्या छायांकित प्रतीचा गैरवापर करून एका चारचाकी शोरूमच्या एजंटने फिर्यादीस कर्जदाराचा परस्पर जामीनदार बनविले. कर्जाचा हप्ता थकविल्याने फिर्यादीचा सिबील स्कोअर खराब करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा भोसरी एमआयडीसी पोलिसांत दाखल करण्यात आला. फिर्यादी विकास धीरेंद्र झा (वय ३४, नोकरी, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून भोसरी येथील एका नामांकित शोरूमच्या एजंटने एका फायनान्स बॅंकेच्या कागदपत्रावर खोट्या सह्या केल्या. त्यावरून कर्जदार देवशाला साळवे यांना वाहन कर्ज मिळाले. त्यांनी थकविलेल्या कर्जामुळे फिर्यादीचा सिबील स्कोअर खराब होऊन त्यांचे नुकसान झाले.
निघोजेत दोन लहानग्यांना चिरडले
पिंपरी ः परवाना नसताना एकाने कंपनीच्या आवारात उभ्या केलेल्या पीकअप वाहनाला असलेली चावी पाहून ते बाहेर काढले. मात्र, त्याच्या धडकेत दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. चालकाविरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवार (ता. ६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास निघोजे (ता. खेड) येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार वीरेंद्र सिंह (रा. निघोजे, फडकेवस्ती) याच्या विरोधात पोलिसांनी फिर्याद नोंदविली आहे.
जुनी सांगवीत हॉटेलचालकाला मारहाण
पिंपरी ः ओळखीच्या मित्रांना मारण्यास आलेल्या तिघांना अडविले म्हणून एका दुकानदाराच्या डोक्यात दगडी गट्टू मारून त्यास जखमी करण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना दत्त आश्रम रोड, जुनी सांगवीमध्ये सोमवारी (ता. ७) घडली. चैतन्य नंदकुमार कदम (वय २३, व्यवसाय, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) यांच्या ओळखीचे आर्यन, प्रथमेश आणि त्यांच्या मित्रांनी दारूच्या नशेत अभिषेक अशोक गायकवाड (वय २१, नोकरी, रा. पिंपळे गुरव) यास मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी अभिषेक त्याचा मित्र विवेक राजू चव्हाण (वय १९, शिक्षण, रा. जुनी सांगवी) आणि एक अल्पवयीन मित्र हे आर्यन आणि प्रथमेश यांचा शोध घेत होते. त्यावेळी हे दोघे फिर्यादी यांच्या चहाच्या दुकानात बसले होते.
गॅस रिफिलींग प्रकरणी कामगारास अटक
पिंपरी ः चिखलीतील मोरे वस्ती येथे बेकायदेशीररित्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय करणाऱ्या कामगाराला पोलिसांनी अटक केली. मात्र दुकानमालक फरार झाला. आरोपींकडून पोलिसांनी ४८ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दुकानचालक आणि कामगार दोघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवार (ता. ८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. परमेश्वर राजेंद्र परिहार (वय २२, रा. चिंचमळा, चिखली) याला पोलिसांनी अटक केली. तर श्रीकांत राजेंद्र गायकवाड (दुकान मालक, रा. मोरे वस्ती, चिखली) याचा शोध पोलिस घेत आहेत.
पिंपरीमधून हातभट्टी दारू जप्त
पिंपरी ः येथील भाटनगरमध्ये एक महिला अवैधरित्या हातभट्टी दारू बनवित असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन असा एकूण ४१ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना मंगळवार (ता. ८) सायंकाळी ६ वाजता घडली. पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल चालक महिला, मुलीस मारहाण
पिंपरी ः किरकोळ कारणावरून मोशीतील तुपे वस्ती येथील हॉटेल चालक महिला आणि तिच्या मुलीस दोन जणांनी मारहाण करत हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. तसेच आरोपींनी काउंटरमधून ३ हजार २०० रूपये काढून घेतले. ही घटना बुधवारी (ता. ९) साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी भूषण गणेश बहिरट (वय २३, रा. गणेशनगर, मोशी) आणि अनोळखी साथीदार यांच्या विरोधात महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. यावेळी मदतीला आलेल्या लोकांवर आरोपीने हातातील कोयता फिरवून दहशत माजविली. तसेच मधे कोणी आले; तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.