

पिंपरी, ता. १० ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या खासगी ठेकेदाराच्या नवीन बस महिनाभरातच मार्गावर बंद पडायला सुरवात झाली आहे. हा प्रकार वारंवार होऊ लागल्याने ‘पीएमपीएमएल’ने एका खासगी ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला असून, तीन दिवस १०० टक्के व एक दिवस ५० टक्के बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ठेकेदाराला आर्थिक दंड केला जात होता. मात्र, ‘पीएमपीएमएल’कडून अशा प्रकारची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’चे एकूण ३८१ मार्ग आहेत. त्यावर साधारण १, ७०० च्या आसपास बस दररोज धावतात. यापैकी ८००-८५० बस ठेकेदारांच्या, तर ७५०-८०० बस ‘पीएमपी’च्या धावतात. ‘पीएमपीएमएल’ने चलनखर्च कमी करण्यासाठी सन २००० मध्ये ठेकेदारांच्या १५० बस घेण्याचा निर्णय घेतला होता. टप्प्याटप्प्याने ठेकेदारांच्या बसची संख्या वाढत गेली. सध्या ताफ्यात ठेकेदारांच्या ९८२ बस आहेत. जीसीसी मॉडेलवर चार ठेकेदारांच्या आणखी ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. ४०० पैकी ९४ सीएनजी बस दाखल झाल्या. यात एका खासगी ठेकेदाराच्या ४९ बस आहेत. पण, या बस महिनाभरातच ब्रेक डाऊन व्हायला सुरवात झाली आहे. नव्याने दाखल झालेल्या बसचे ब्रेकडाऊन होऊ लागल्याने पीएमपीबाबत जनमानसात प्रतिमा खराब होत असल्याने पीएमपीएमएलने प्रशासनाने ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. भेकराई आणि शेवाळवाडी आगारात संचलनात असलेल्या या ठेकेदाराच्या ४९ बस गुरुवारी (ता. १०) १०० टक्के (४९ बस), शुक्रवारी ५० टक्के, शनिवारी आणि रविवारी १०० टक्के बंद ठेवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.
------------------
प्रवाशांचे मात्र हाल
पीएमपीएमएल प्रशासनाने ठेकेदाराच्या बस वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने चार दिवस बस बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, पीएमपीएमएलने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने काही मार्गावर दोन ते तीन तास बस नव्हत्या. प्रवाशांना तास न् तास बसथांब्यावर ताटकळत थांबावे लागले. काही प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास केला. पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
------------
‘‘ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसपैकी काही बस ब्रेकडाऊन होत असल्याचे निदर्शनास आले होते. बसगाड्यांची देखभाल व दुरुस्तीबाबत ठेकेदाराने करारातील अटींची पूर्तता केली नसल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.