

पिंपरी, ता. १८ : लग्नसराईत शहरांसह ग्रामीण भागात मांडव डहाळ्यांच्या कार्यक्रमांना उधाण आले आहे. पूर्वी धार्मिक आणि पारंपरिक विधी म्हणून साजरा होणारा मांडव डहाळा आता डीजे, फटाके, मोठ्या मिरवणुका आणि लाखोंच्या खर्चामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. परंपरेपेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न आणि दिखावा अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. परिणामी ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि नागरिकांचा त्रास वाढू लागला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत लग्नाआधी मांडव डहाळ्याची परंपरा पाळली जाते. लग्नाच्या मंडपासाठी आवश्यक असलेल्या डहाळ्या किंवा झाडांच्या फांद्या आणून त्यांची पूजा करण्याची ही जुनी प्रथा आहे. काही ठिकाणी गावातील विशिष्ट झाडाची डहाळी शुभ मानली जाते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि गावकरी एकत्र येऊन पारंपरिक वाद्यांच्या साथीने हा कार्यक्रम पार पाडत असत. पूर्वी या कार्यक्रमात साधेपणा, धार्मिक भावना आणि सामाजिक एकोपा दिसत होता. ढोल-ताशे, हलगी किंवा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जात असे. कार्यक्रमानंतर गावकऱ्यांना भोजन दिले जाई. यात प्रतिष्ठेची स्पर्धा नव्हती; उलट एकत्रित आनंद आणि परंपरेचे जतन यावर भर होता. पण, आता मांडव डहाळ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीजेचा आवाज अनेकदा कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असतो. वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा अनेक ठिकाणी मांडव डहाळ्याच्या मिरवणुका मुख्य रस्त्यांवरून काढल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
बदलत्या काळात बदलले स्वरूप
गेल्या काही वर्षांत मांडव डहाळ्याचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. आता या कार्यक्रमात डीजे, लेझर लाईट, धुराचे इफेक्ट, फटाक्यांची आतषबाजी, महागडी सजावट आणि शेकडो वाहनांच्या मिरवणुका दिसून येतात. काही ठिकाणी डीजेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे.
वरात बंद झाल्याचा परिणाम
वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण आणि सुरक्षेच्या कारणांमुळे काही शहरांमध्ये लग्नातील वरातींवर निर्बंध आले. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या वरातींमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने नियम कडक केले आहेत. मात्र, त्याचा परिणाम मांडव डहाळ्यांवर झाल्याचे दिसत आहे. पूर्वी लग्नाच्या दिवशी निघणारी भव्य मिरवणूक आता मांडव डहाळ्याच्या दिवशीच काढली जाते. त्यामुळे मांडव डहाळ्याला ‘मिनी वरात’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कागदांच्या चिटोऱ्या
सध्या मिरवणुकीत रंगीबेरंगी कागदांच्या टोऱ्या एका मशीमधून उडविण्याची ‘फॅशन’ आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हाच कचरा दुचाकीस्वारांवर उडून अपघाताच्या घटनाही घडतात.
परंपरा जपणे महत्त्वाचे असले, तरी त्याचे अतिरेकी प्रदर्शन योग्य नाही. केवळ प्रतिष्ठेसाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. परंपरा आनंदासाठी असते, स्पर्धेसाठी नाही. साधेपणा, सामाजिक जबाबदारी आणि नियमांचे पालन याला प्राधान्य देण्याची गरज आहे.
- तेजस गरुड, रहिवासी, चांदखेड
PNE26W19994
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.