वायसीएममध्ये डॉक्टरांची कमतरता

वायसीएममध्ये डॉक्टरांची कमतरता
Published on: 

पिंपरी, ता. १२ ः महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयावर वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाचीही जबाबदारी आहे. मात्र, रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेच्या २०२६-२७ च्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला (एमयूएचएस) सादर केलेल्या अहवालात सात विभागांमध्ये सात सहाय्यक प्राध्यापक आणि चार वरिष्ठ निवासी डॉक्टरांची कमतरता नोंदविली आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवा आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर होऊ नये, यासाठी विभागनिहाय मनुष्यबळ समतोल राखण्याची आवश्यकता आहे.

वायसीएममध्ये ७५० रुग्ण खाटा आहेत. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार बाह्यरुग्ण विभागात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या सरासरी तीन हजार २८८ आहे. अशा रुग्णालयात विविध आजारांची लक्षणे, तपासणी आणि उपचार समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासोबत अध्यापकांचे मार्गदर्शन आवश्यक असते. वायसीएमच्या अहवालानुसार जनरल मेडिसिन, बालरोग आणि त्वचारोग विभागांत प्रत्येकी एक, तर जनरल सर्जरी व अस्थिरोग विभागांत प्रत्येकी दोन सहाय्यक प्राध्यापक कमी आहेत. अस्थिरोग विभागात दोन, सूक्ष्मजीवशास्त्र आणि कम्युनिटी मेडिसीन विभागांत प्रत्येकी एक वरिष्ठ निवासी डॉक्टर कमी आहे.

वैद्यकीय प्रवेशाच्या ७५० जागा
शहरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या २५० जागा आहेत. दंतचिकित्सा, आयुर्वेद, नर्सिंग आणि फिजिओथेरेपीच्या प्रत्येकी १०० जागा आहेत. निगडीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या १०० जागा आहेत. या सहा प्रमुख पदवी अभ्यासक्रमांची वार्षिक प्रवेशक्षमता ७५० आहे. हे अभ्यासक्रम चार ते पाच वर्षांचे आहेत. त्यामुळे विविध वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम, जीएनएम, पोस्ट-बेसिक नर्सिंग, एमएस्सी नर्सिंग व अन्य पॅरामेडिकल अभ्यासक्रमांचा त्यात समावेश नाही. वायसीएम रुग्णालयात नर्सिंग प्रशिक्षणाची सुविधा असून, शहरात किमान सात ते आठ नर्सिंग महाविद्यालये आहेत.

‘‘पुस्तकातील माहिती आणि प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी यात मोठा फरक असतो. रुग्णाची माहिती घेणे, तपासणीची क्रमवारी आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निदान समजून घेण्याची संधी पुरेशी मिळाली, तर आत्मविश्वास वाढतो.
- डॉ. राजेश सोनी (नाव बदललेले), पिंपरी

शहरातील प्रमुख अभ्यासक्रमांची वार्षिक प्रवेश क्षमता
अभ्यासक्रम / प्रवेश क्षमता
एमबीबीएस / २५०
बीडीएस / १००
बीएएमएस पिंपरी / १००
बीएएमएस निगडी / १००
बी.एस्सी. नर्सिंग / १००
बीपीटी / १००

वायसीएम रुग्णालयात रिक्त पदे
विभाग / पद / आवश्यक / उपलब्ध / कमतरता
जनरल मेडिसीन / सहाय्यक प्राध्यापक / ५ / ४ / १
बालरोग / सहाय्यक प्राध्यापक / ५ / ४ / १
त्वचारोग / सहाय्यक प्राध्यापक / १ / ० / १
जनरल सर्जरी / सहाय्यक प्राध्यापक / ७ / ५ / २
अस्थिरोग / सहाय्यक प्राध्यापक / ५ / ३ / २
अस्थिरोग / वरिष्ठ निवासी डॉक्टर / ३ / १ / २
सूक्ष्मजीवशास्त्र / वरिष्ठ निवासी डॉक्टर / २ / १ / १
कम्युनिटी मेडिसीन / वरिष्ठ निवासी डॉक्टर / ३ / २ / १
एकूण पदे / प्राध्यापक व डॉक्टर / ३१ / २० / ११
---

Marathi News Esakal
www.esakal.com