

तळेगाव दाभाडे, ता. ८ : ‘‘आज तंत्रज्ञानाचा मानवी संबंधांवर परिणाम होण्याचा काळ आहे. आपण काय वाचावे, काय पाहावे, कोणत्या गोष्टी आपल्या समोर याव्यात, हे अल्गॉरिदम ठरवत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानापासून दूर जाणे हा मार्ग नाही; मात्र, आपल्या हातात दिलेले प्रत्येक तंत्रज्ञान योग्यच आहे, असा भ्रमही ठेवता कामा नये. ते समजून, पारखून आणि सुयोग्य पद्धतीने वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने संस्थापक चिटणीस कै. वि. गो. तथा गुरूवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या १०० व्या पुण्यस्मरणानिमित्त शिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे शैक्षणिक संकुलातील सभागृहात आयोजित उद्बोधन सभेत फडणीस बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री संजय भेगडे होते. तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, संचालक गणेश खांडगे, चंद्रकांत शेटे, सल्लागार वसंत भेगडे, महेश शहा, सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे आदी उपस्थित होते.
फडणीस म्हणाले,‘‘समाजाच्या श्रद्धा, संस्कार, परंपरा आणि मूल्ये ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. मात्र, प्रत्येक पिढीसमोरची साधने बदलत असतात. आजचे सर्वांत प्रभावी साधन तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाकडे केवळ सुविधा म्हणून पाहून चालणार नाही. त्याचा मानवी संबंध, विचार आणि पुढच्या पिढीच्या जडणघडणीवर काय परिणाम होतो आहे, याचाही विचार करावा लागेल.’’
पालकवर्गाच्या भूमिकेकडे लक्ष वेधताना ते म्हणाले,‘‘आजच्या पिढीची भाषा ही तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या साधनांवरची भाषा आहे. त्या साधनांपासून अनभिज्ञ असलेला पालकवर्ग जेव्हा या भाषेकडे पाहतो, तेव्हा त्याला धक्का बसतो. त्यामुळे मुलांना केवळ तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याऐवजी पालकांनीही तंत्रज्ञान शिकले पाहिजे. त्याचा सकारात्मक आणि सुयोग्य वापर कसा करता येईल, हे समजून घेतले पाहिजे आणि कोणते तंत्रज्ञान योग्य आहे, हे पुढच्या पिढीला सांगण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे.’’
अध्यक्षीय भाषणात संजय भेगडे यांनी अण्णासाहेब विजापूरकर यांच्या कार्याचा गौरव केला. ‘‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून अण्णासाहेबांनी शिक्षणाचा जो वटवृक्ष लावला. तो आज समाजासाठी ज्ञानाचा विशाल आधार झाला आहे. संस्थेच्या इतिहासातील हा कार्यक्रम सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल,’’ असे ते म्हणाले.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक गणेश खांडगे यांनी केले. संजय खराडे, सुवर्णा काळडोके यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार शेलार यांनी आभार मानले.
फोटो आयडी - ०६०१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.