पीएमआरडीए भूखंडाच्‍या 
ई-लिलावाची प्रक्रिया लांबणीवर

पीएमआरडीए भूखंडाच्‍या ई-लिलावाची प्रक्रिया लांबणीवर

Published on

पिंपरी, ता. १९ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जमीन व मालमत्ता विभागामार्फत राबविण्यात येणारी पंधरापेक्षा अधिक भूखंडाची लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. महापालिका आणि जिल्‍हा परिषद आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबणार असून, त्‍यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. फेब्रुवारीनंतर या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
पीएमआरडीएचे विविध भूखंड ८० वर्षांच्‍या कालावधीकरिता भाडेपट्ट्याने वाटप केले जाणार आहे. शैक्षणिक, व्यावसायिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक सुविधांसाठी हे राखीव भूखंड आहेत. साधारण भोसरी, चिखली, रहाटणी, रावेत, मोशी या भागांतील भूखंडांचा यामध्ये समावेश आहे. या भूखंडांच्‍या ई-लिलावासाठी https://eauction.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. आचारसंहितेपूर्वी ९ डिसेंबर रोजी तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्‍यांची घोषणा करण्यात येणार आहे. तर, १० डिसेंबर रोजी ई-लिलावाची प्रक्रिया संकेस्‍थळावर सुरू होणार असल्‍याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरक्षण तसेच जिल्‍हा परिषद आरक्षण जाहीर होणार आहे. त्‍यामुळे लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता फेब्रुवारीपासून ई-लिलाव प्रक्रियेला पुन्‍हा सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. भोसरीतील सेक्‍टर एक, दोन, तीन, सात, चिखली, रहाटणी, रावेत बोऱ्हाडेवाडी आदी परिसरातील भूखंडासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

‘‘आचारसंहितेमुळे संबंधित भूखंडाची प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. फेब्रुवारीत मुदत दिली आहे. त्‍यामुळे आचारसंहिता संपल्‍यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- हिम्मत खराडे, उपायुक्त, जमीन व मालमत्ता विभाग
---

Marathi News Esakal
www.esakal.com