स्थायीसह विषय समित्यांची 
दालने चार वर्षांनी उघडणार

स्थायीसह विषय समित्यांची दालने चार वर्षांनी उघडणार

Published on

पिंपरी, ता. २० ः विविध कारणांनी सुमारे चार वर्ष रखडलेली महापालिका निवडणूक अखेर झाली आहे. नवनियुक्त नगरसदस्य सभागृहात प्रवेश करणार आहेत. शिवाय, महापौर, उपमहापौर, पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, विजयी पक्षांचे गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांसह विविध विषय समित्यांची दालनेही उघडणार आहेत. त्याची तयारी नगरसचिव विभागाने सुरू केली असून, त्याअनुषंगाने स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्याची सूचना संबंधित विभागांना केली आहे.
कोविड प्रतिबंधक नियमावली, इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलती समीकरणे आदी कारणांमुळे १३ मार्च २०२२ रोजी मुदत संपलेल्या महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, १२८ नगरसदस्यांना मतदारांनी निवडून दिले आहे. गुरुवारी (ता. २२) महापौर आरक्षणाची सोडत मुंबईत निघणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात सर्वसाधारण सभा होऊन महापौर, उपमहापौर, पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, विजयी पक्षांचे गटनेते यांच्यासह स्थायी समिती, विधी समिती, जैवविविधता व्यवस्थापन समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, शिक्षण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समित्यांचे अध्यक्ष सदस्यांची निवड प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक समितीचे स्वतंत्र दालन आहे. ही सर्व दालने महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आहेत. मात्र, मार्च २०२२ मध्ये पदाधिकाऱ्यांची मुदत संपली तेव्हापासून सर्व दालने बंद होती. मध्यंतरी काही विभागांच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष नसल्यामुळे उपमहापौर व पक्षनेत्यांच्या दालनासह विषय समित्यांच्या कक्षेत अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, आता सर्व समित्यांवर लोकप्रतिनिधी नियुक्त होणार असल्याने सर्व दालनांची दुरुस्ती प्रशासनाने सुरू केली आहे.

नगरसचिवांचे विभागांना पत्र
महापालिका नगरसचिव मुकेश कोळप यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांतील कार्यकारी अभियंत्यांना स्वतंत्रपणे पत्र पाठविले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या दालनांची साफसफाई करून देणे, महापौर गणवेश (गाऊन) व चोपदाराचा गणवेश शिलाई करून देणे, सर्व दालनांतील विद्युत व्यवस्था दुरुस्ती करून देणे आदी कामांचा समावेश आहे. यामध्ये फर्निचर व विद्युतसह विविध प्रकारच्या वस्तूंचाही समावेश आहे.

कर्मचारीही वर्ग करणार
मार्च २०२२ मध्ये मुदत संपण्यापूर्वी विविध दालनात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्त अन्य विभागात प्रशासन विभागाने केली होती. अद्यापही हे सर्व अधिकारी, कर्मचारी त्या-त्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यांतील काही सेवानिवृत्त झाले असून, काहींची अन्य विभागात बदली झाली आहे. आता सर्व दालने पुन्हा सुरू होणार असल्याने त्यांना पुरेसे मनुष्यबळ पुरविण्याची मागणी नगरसचिव विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. यामध्ये मुख्य लिपिक, लिपिक, वाहनचालक, शिपाई, मजूर, महिला शिपाई आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com