उद्योगनगरीत जल्लोषात स्वागत
पिंपरी, ता. २० ः ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले. मार्गाच्या दुतर्फा थांबून नागरिकांनी स्पर्धा अनुभवली. महापालिकेने मार्गासह चौकांत ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली होती.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौकात सायकलपटूंचे आगमन होताच जोरदार स्वागत केले. लक्ष्मी चौक- भूमकर चौक- डांगे चौक- श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे सायकलपटू पोहोचले. महापालिकेने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी व्यापक तयारी केली होती. स्पर्धा मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा, आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन केले होते. काही कालावधीसाठी मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली होती. चौकाचौकांत उद्यान विभागाने फुलांची सजावट केली होती.
आकर्षक भित्तिचित्रे
स्पर्धेच्या निमित्ताने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबविला. भित्तिचित्रांमध्ये केवळ सायकलिंगच नव्हे, तर विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंचा गौरव केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचे दर्शनही या भिंतींवर घडविले आहे. या कलेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा उत्सवासाठी योग्य वातावरणनिर्मिती झाली आहे.
शुक्रवार पुन्हा थरार
बजाज पुणे ग्रँड टूरचा शेवटचा टप्पा शुक्रवारी (ता. २३) शहरात असेल. दुपारी १.३० वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून प्रारंभ होईल. औंध येथील राजीव गांधी पुलावरून सायकलपटू पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करतील. काळेवाडी फाटा- डांगे चौक- संत तुकाराम महाराज पूल रावेत- डी. वाय. पाटील कॉलेज- भक्ती-शक्ती चौक- त्रिवेणीनगर चौक- दुर्गानगर चौक- इंद्रायणीनगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल- भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल- स्पाइन रोड- जुना आरटीओ रस्ता- केएसबी चौक पूल- आयुक्त बंगला- एम्पायर इस्टेट पूल- काळेवाडी फाटा- रक्षक चौक- राजीव गांधी पूल (औंध) येथून पुण्यात प्रवेश करतील. या टप्प्याचा समारोप दुपारी ४ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

