जगाला सध्या युद्ध नको 
बुद्ध हवा ः माडगूळकर

जगाला सध्या युद्ध नको बुद्ध हवा ः माडगूळकर

Published on

पिंपरी, ता. ३१ ः ‘‘जगामध्ये रशिया-युक्रेन, गाझापट्टीमध्ये युद्ध चालू आहे. युद्धामध्ये असंख्य निरपराध लोकांचा बळी जात आहे. म्हणून युद्ध हे निंद्य आहे. जगाला सध्या युद्ध नको बुद्ध हवा आहे. महात्मा गांधी जगाचे नेते होते,’’ असे प्रतिपादन महात्मा गांधी विचार संस्थेचे अध्यक्ष बी. आर. माडगूळकर यांनी केले.
महात्मा गांधी विचार संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ३०) मोरवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माडगूळकर बोलत होते. डॉ. मनीषा गरुड आणि जगन्नाथ आल्हाट यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अरविंद देशपांडे यांनी गीत सादर केले. देशपांडे म्हणाले, ‘‘गांधी यांनी स्वच्छता, साधेपणा, सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार केला.’’ डॉ. गरुड म्हणाल्या, ‘‘काही लोक महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यात वाद होते, असे सांगतात, पण ते खरे नाही. डॉ. आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळे येथे सत्याग्रह केला, त्यावेळी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनच सत्याग्रहाला सुरुवात केली होती.’’ डॉ. आल्हाट म्हणाले, ‘‘महात्मा गांधी हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्याने श्रीमद् भगवद्गीता आणि अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांच्या मनात सर्वधर्मसमभाव हेच तत्त्व होते.’’ सिमरन कुरेशी म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. गांधींच्या पाठीमागे सर्व देश उभा होता. चरख्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला.’’ सूत्रसंचालन बी. आर. माडगूळकर यांनी केले. हनुमंत गुब्याड यांनी आभार मानले.
-----------

Marathi News Esakal
www.esakal.com