दहावी-बारावीच्या ९० टक्के वर्ग खोल्यांमधील कॅमेरे
पिंपरी, ता. २ ः दहावी-बारावीच्या आगामी परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य केले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ९० टक्के केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मंडळामार्फत बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षांदरम्यान किती परीक्षा केंद्रांवरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित आहे, याची चाचपणी मंडळ करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध असलेल्या केंद्रांनाच मान्यता मिळेल. यंदा मंडळाने सीसीटीव्हीची सुविधेवर जास्त भर दिला आहे.
---
सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे केवळ देखरेख नाही, तर ती एक शिस्त आहे. जेव्हा विद्यार्थ्याला माहीत असते की आपण ‘वॉच’ खाली आहोत, तेव्हा त्याचे लक्ष विचलित होत नाही. यामुळे परीक्षेचे गांभीर्य वाढेल आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळाची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावेल.
- गणेश काळे, सचिव, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ
कॅमेऱ्यांमुळे अफवांना पूर्णविराम मिळेल. प्रामाणिक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय म्हणजे एक प्रकारचे ‘सुरक्षा कवच’ आहे, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता जगासमोर स्पष्टपणे येईल.
- हेमंत आभोणकर, मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद विद्यालय रुपीनगर
कॅमेरे बसविल्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारी बाहेरील गर्दी आणि गैरप्रकारांचे प्रयत्न थांबतील. यामुळे केवळ विद्यार्थ्यांवरच नाही, तर पर्यवेक्षकांवर येणारा दबावही कमी होईल.
- संध्या वाळुंज, मुख्याध्यापिका, पंडित वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, नेहरूनगर
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना घाबरवणे नसून, परीक्षेची शुचिता राखणे हा आहे. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे गैरप्रकारांना कायमचा लगाम लागणार आहे.
- प्रदीप तळेकर सहशिक्षक, राजा शिवछत्रपती विद्यालय, डुडुळगाव
---
सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल नाही
परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी यांची दरवर्षीप्रमाणे सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती कर्मचाऱ्यांची अदलाबदली केल्यास शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील इतर वर्गांचे (इयत्ता पाचवी ते नववी व .११वी) कामकाज करणे कठीण होईल, तसेच प्रत्येक पेपरच्या वेळी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे-येणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे होईल. यान्वये होणारा खर्च व इतर बाबी लक्षात घेता सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत, अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी विनंती करण्यात आली.
---
मुख्याध्यापक नाराज
शासनाने संस्था चालकांना सीसीटीव्ही बसविण्याबाबत आदेश दिले पाहिजेत. संस्थाचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनुदानित शाळांमध्ये शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात नसल्याने पैशाचे स्रोत नाहीत. त्यामुळे दहा टक्के शाळांना सीसीटीव्हीसाठी निधी उपलब्ध करणे कठीण होत आहे. शासन मात्र संस्थाचालकांना सोडून मुख्याध्यापकांना कारवाईचे आदेश देत असल्याने अनेक मुख्याध्यापक नाराज आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

