दीदी आणि मी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दीदी आणि मी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचा उलगडलेला जीवनपट, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्‍वगायिका सावनी रवींद्र यांनी गायनातून दिलेली साथ आणि टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘दिदी आणि मी ः एक अविस्मरणीय संगीतप्रवास’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
सकाळ माध्यम समूहातर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या चौथ्या पुण्यातिथीनिमित्त रविवारी (ता. १) प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार तथा लता दीदींचे बंधू पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी स्वतः लता दिदींच्या आयुष्यातील आणि संगीत प्रवासातील अनेक आठवणी, अनुभव व किस्से रसिकांसमोर उलगडले. काही किस्से ऐकून उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले, तर काही आठवणी आणि किस्से ऐकून श्रोते हळहळ व्यक्त करत होते. लता दीदींनी गायलेली गाणी त्यामागील आठवणी आणि किस्सेही पंडित ह्रदयनाथ यांनी सांगितले.
‘यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल’, ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला’, ‘बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला’, ‘‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’, ‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते’, ‘‘माज्या सारंगा राजा सारंगा’, ‘कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा’ ही मराठी गाणी तर ‘आज कल में ढल गया, दिन हुआ तमाम तू भी सो जा’, ‘आ जाने जा आ जाने जा, आ मेरा ये हुस्न जवान जवान जवान’, ‘रात भी है कुछ भीगी भीगी चाँद भी है कुछ मद्धम-मद्धम’, ‘कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं’, ‘दिलबर दिलसे’, ‘जरासी आहट होती है’, ‘आएगा आनेवाला’, ‘बेकस पे करम कीजिए या लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी व हिंदी अजरामर गीतांचे सादरीकरण राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्‍वगायिका सावनी रवींद्र यांनी केले. त्यांना सहगायक हरीश गुरव, इंजमाम बारगीर, केतन पवार, भक्ती लोहार, स्वप्नाली लोंढे, तारिका तिरपतीवार व तबलावादन नितीन शिंदे, कीबोर्ड विवेक परांजपे व मिहीर भडकमकर, ऑक्टोपॅड अजय अत्रे, गिटार नितीन कुलकर्णी, पखवाज डॉ. राजेंद्र दूरकर, बासरीवादक अमर ओक यांची साथ लाभली. ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ या गाण्याला श्रोत्यांकडून ‘वन्समोअर’ मिळाला.
सकाळ माध्यम समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, संगीत संयोजक विवेक परांजपे आणि गायिका सावनी रवींद्र यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उममुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com