वाहनावरून जाताना लिफ्ट देताय सावधान!

वाहनावरून जाताना लिफ्ट देताय सावधान!

Published on

पिंपरी, ता. २ : ‘अर्जंट आहे, कृपया थोड्या अंतरावर सोडा,’ ‘पेट्रोल संपले आहे,’ ‘मोबाईल बंद आहे,’ ‘रुग्णालयात जायचे आहे,’ ‘गाडी बिघडली आहे,’ अशी भावनिक विनंती करून रस्त्याने वाहनावरून जाणाऱ्या व्यक्तीकडे लिफ्ट मागितली जाते. अशावेळी मदतीच्या भावनेने लिफ्ट दिली जाते. मात्र, काही वेळेला मदतीच्या भावनेचा गैरफायदा घेत ज्याला मदत केली त्यानेच मदत करणाऱ्याला लूटमार केल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे लिफ्ट देताना सावधगिरी बाळगणे, गरजेचे बनले आहे.
लिफ्ट दिल्यानंतर सुरुवातीला अत्यंत नम्रपणे बोलून विश्वास संपादन केला जातो. प्रवास सुरू झाल्यानंतर संधी साधून अचानक मारहाण, धमकी किंवा चाकूचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने लुटले जातात. काही गुन्हेगार टोळक्याने काम करतात. एकजण लिफ्ट मागतो, तर काही अंतरावर त्याचे साथीदार दबा धरून थांबलेले असतात. निर्जन रस्ता, अंधाराचा फायदा किंवा सीसीटीव्ही नसलेले परिसर हेरून लूटमार केली जाते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पसार होणे सोपे जाते.
मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १७० जबरी चोरीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये लिफ्ट देताना घडलेल्या लूटमारीच्याही काही घटनांचा समावेश आहे.

पगाराच्या दिवसात अधिक घटना
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. कंपनीत सेकंड शिफ्ट करून सुटल्यानंतर अनेक कामगार रात्रीच्या वेळी घरी जात असतात. तर, अनेक कामगार नाइट ड्युटीला कंपनीत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवास करतात. दुचाकीवरून जाताना काही जणांकडून लिफ्ट मागितली जाते. मात्र, लिफ्ट दिल्यानंतर पिंपरी, चिंचवड, महाळुंगे, भोसरी, तळेगाव या भागांत लुटमारीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पगाराच्या दिवसांत म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत असे प्रकार अधिक प्रमाणात घडतात.

हे करा
- अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देताना सावधगिरी बाळगा
- रात्रीच्या वेळी किंवा निर्जन रस्त्यांवर लिफ्ट देणे टाळा
- लिफ्ट द्यायचीच असल्यास गर्दीच्या ठिकाणीच मदत करा
- मोबाईल, पर्स, दागिने सहज दिसणार नाहीत याची काळजी घ्या
- संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ ११२वर संपर्क साधा

‘‘परिसरात सतत पोलिसांची गस्त असते. संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवून कारवाईदेखील केली जाते. नागरिकांनी वाहनांवरून जाताना एखाद्याला लिफ्ट देतेवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांच्या मदतीसाठी ११२ क्रमांकावर कॉल करून मदत मिळवू शकता.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com