गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

भोसरीत तरुणावर चाकूने वार

पिंपरी : ‘‘आमच्याबद्दल सुपरवायझरला खोटी माहिती का देतो’’, असे म्हणत तरुणाला मारहाण करण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली.
या प्रकरणी नारायण लखणे (रा. देवकर वस्ती, भोसरी, मूळ लातूर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवि तेलंगे, यज्ञेश्वर तेलंगे आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र नवनाथ खामकर घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘‘आमच्याबद्दल सुपरवायझरला खोटी माहिती का देतो,’’ असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचा मित्र अजित कोरे याने फिर्यादीला केलेल्या मारहाणीचा आरोपींना जाब विचारला असता, आरोपी यज्ञेश्वर याने धमकी देत पोटात चाकूने वार केले. यात अजित हे गंभीर जखमी झाले.

चऱ्होलीत जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी : चऱ्होली बुद्रुक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चोविसावाडी येथील खालचा मळा येथे करण्यात आली. या कारवाईत प्रशांत जुन्नरकर, संतोष तापकीर, सोमनाथ हिवरेकर, संजय बारेला, संतोष चराटे, संतोष गायकवाड, तुकाराम मुंगसे, समीर अन्सारी, प्रमोद खोरपे, अब्दुल सय्यद, अनिल तापकीर, परमानंद भागवत, सुनील परदेशी, जुगार चालविणारा बाळासाहेब तापकीर आणि पसार झालेल्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मद्य विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या विक्रीसाठी मद्य बाळगणाऱ्या महिलेवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने वाकड येथील वेणुनगर येथे कारवाई केली. सदर महिला वाकड रस्त्यावर मद्य विक्रीसाठी थांबली होती. पोलिसांनी तिच्याकडून ७ हजार २०० रुपये किमतीचे मद्य जप्त केले असून तिच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com