दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याचा नियम धाब्यावर

दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याचा नियम धाब्यावर

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देणे शासन निर्णयानुसार शोरूम चालकांना बंधनकारक आहे. पण, या नियमाला केराची टोपली दाखवली जात असताना त्यांच्यावर मात्र ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे एक ते ३१ जानेवारीदरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ नावापुरतेच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेदरकार वाहन चालवणे (रॅश ड्रायव्हिंग), क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मानवी चुकांसह अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण यामुळे अपघात होत आहेत. गेल्या काही वर्षांत अपघातांची संख्या वाढली आहे. यात दुचाकी अपघात आणि दुचाकीचालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या रोखण्यासाठी शासनाने हेल्मेटसक्ती केली आहे. नवीन नियमानुसार दुचाकी विक्री करताना शोरूम चालकांनी मोटार सायकलस्वार आणि त्याच्या सहप्रवाशासाठी या दोघांसाठीही हेल्मेट देणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील दुचाकी विक्री करणारे शोरूम चालक दुचाकीबरोबर एकही हेल्मेट देत नाहीत. काही शोरूमचालक एक हेल्मेट देतात, मात्र त्याची रक्कम ग्राहकांकडून वसूल करतात.

नियम पाळला जातो का?
केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार नवीन दुचाकी घेणाऱ्या ग्राहकाला एक हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परिवहन विभागाने २०१६ मध्ये परिपत्रक काढून नवीन दुचाकी घेणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले होते. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रायलायनेही २०२५ मध्ये केंद्रीय मोटर वाहन अधिनियम १९८९ च्या कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचविले होते. वाहन उत्पादक कंपन्यांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले होते. मात्र, आजही या नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

हेल्मेट बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला
शहरातील दुचाकी वाहनांच्याशोरूममध्ये ग्राहक दुचाकी खरेदीसाठी गेले असता, हेल्मेटचे वेगळे पैसे भरण्यास सांगितले जाते किंवा हेल्मेट बाहेरच्या दुकानांतून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे काही ग्राहक शोरूममध्ये अधिक पैसे मोजून हेल्मेट खरेदी करतात.

‘आरटीओ’कडून कारवाई नाहीच
वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, दुचाकी विकणाऱ्या शोरूम चालकांकडून नियमांना केराची टोपली दाखली जात असताना ‘आरटीओ’कडून कारवाई होताना दिसून येत नाही.

मी दुचाकी विकत घेतली. मला दुचाकीबरोबर एक हेल्मेट दिले. मात्र, त्याचे वेगळे पैसे आकारले. शासनाचा नियम असला, तरी शोरूमचालक सर्रास उल्लंघन करत आहेत.
- तुषार वाळके, नागरिक

वाहन उत्पादक कंपन्या वाहन विक्रेत्यांना किंवा डीलरला हेल्मेट देत नाहीत. डीलरलाच हेल्मेट खरेदी करुन ग्राहकांना द्यावे लागतात.
- मनीष मोहिते, संचालक, ‘जय माता दी ग्रीन’

शोरूम चालकांनी दुचाकी खरेदीवेळी ग्राहकांना दोन हेल्मेट न दिल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. आल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाते.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड


PNE26V92348

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com