बाऊन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड

बाऊन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड

Published on

पिंपरी, ता. ३ : लग्नसोहळा असो की, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह इतर सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिक असोत वा नवउदयोन्मुख नेते किंवा व्यावसायिक असे अनेकजण बाऊन्सरच्या गराड्यात, महागड्या वाहनांच्या ताफ्यासह सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणे, ‘पॉवरफुल’ असल्याचा आभास निर्माण करणे, हा या ट्रेंडमागील मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
पूर्वी ही संस्कृती केवळ चित्रपटसृष्टी, मोठे उद्योजक किंवा धोका असलेल्या व्यक्तींपुरती मर्यादित होती. मात्र, आता कोणताही प्रत्यक्ष धोका नसतानाही खासगी सुरक्षारक्षक, काळ्या कपड्यातील बाऊन्सर आणि आलिशान वाहनांचा ताफा सोबत ठेवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. लग्नसमारंभ, उद्‍घाटन कार्यक्रम, वाढदिवस, अगदी हॉटेलमध्ये जेवायला जातानाही हा ‘शो’ पाहायला मिळतो. एकीकडे साधेपणा आणि कायद्याचे पालन अपेक्षित असताना, बाऊन्सरच्या गराड्यात फिरण्याचा हा वाढता ट्रेंड समाजात वाढत आहेत. ही प्रवृत्ती ‘प्रतिष्ठेचे प्रदर्शन’ आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासातून वाढत आहे. सुरक्षा ही गरज असेल तेव्हा योग्य आहे, मात्र केवळ समाजात दहशत किंवा प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेला बाऊन्सरचा वापर हा चुकीचा संदेश देतो.

वाहतूक कोंडी अन् तक्रारी
या प्रकारामुळे अनेकदा सार्वजनिक रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. ताफ्यातील वाहनांची बेदरकार पार्किंग, सामान्य नागरिकांना बाजूला सारण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. काहीवेळा बाऊन्सरकडून अरेरावी केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

लक्ष वेधण्याचा प्रयत्न
एखाद्या व्यक्तीसोबत बलदंड शरीर यष्टीचे बाउन्सर पाहायला मिळतात. संबंधित व्यक्ती पुढे येण्याअगोदरच हे बाऊन्सर समोर येऊन त्यांना मार्ग करून देत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे बाऊन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. समाजात छाप पाडण्यासाठी खटाटोप केला जात असल्याचे बोलले जाते. शहरातही असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.

‘‘ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्याठिकाणी बाऊन्सर असावेत. मात्र, केवळ देखाव्यासाठी व वेगळी छाप पाडण्यासाठी बाऊन्सर सोबत ठेवणे योग्य नाही. हा देखावा कशासाठी असावा. आपल्या कर्तृत्वातून स्वतःची ओळख निर्माण करा.
- राहुल नेवाळे, नागरिक
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com