पदपथावरील अर्धवट लोखंडी खांबांचा जिवाला धोका

पदपथावरील अर्धवट लोखंडी खांबांचा जिवाला धोका

Published on

पिंपरी, ता. ३ : शहरातील पदपथांवर अनधिकृत फलक काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या लोखंडी खांबांमुळे पादचाऱ्यांचे अपघात होत असून, ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी होत आहेत. हे धोकादायक अवशेष महापालिकेने तातडीने हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील चौक आणि पदपथांवर ऑनलाइन तात्पुरता परवाना घेऊन लावलेले फलक मुदत संपल्यानंतरही न काढल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. विशेषतः पदपथांवरील फलक काढल्यानंतरही त्यांचे लोखंडी खांब अर्धवट स्थितीत ठेवले जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरात विविध उद्घाटन समारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांच्या जाहिरातींसाठी फलक व होर्डिंग लावले जातात. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत यासाठी परवानगी दिली जाते. जाहिरात शुल्क कमी असल्याने अनेक व्यावसायिक एक ते सात दिवसांचा तात्पुरता परवाना घेतात; मात्र मुदत संपल्यानंतरही हे फलक हटवले जात नाहीत. नियमानुसार ठरलेल्या कालावधीनंतर फलक काढण्याची जबाबदारी संबंधितांची असते, परंतु त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.
पदपथांवर फलक लावण्यासाठी रोवलेले लोखंडी खांब अनेक ठिकाणी मुळापासून काढले जात नाहीत. ते अंधारामुळे दिसत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. मोरवाडी चौकातून एम्पायर इस्टेटकडे जाताना अशाच एका अर्धवट खांबामुळे धडकून मोरवाडी येथील रहिवासी प्रतिभा (नाव पूर्ण दिले नाही) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डाव्या हाताची दोन हाडे तुटली असून नाकाला आठ टाके पडले आहेत. या उपचारासाठी त्यांना आतापर्यंत मोठा खर्च करावा लागला आहे. ‘‘प्रशासनाने केवळ कारवाई न करता पदपथांवरील धोकादायक लोखंडी अवशेष हटवणे आवश्यक आहे,’’ अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

महापालिकेने आता एक ते सात दिवसांचा तात्पुरता परवाना देणे बंद केले आहे. अनधिकृत फ्लेक्स आणि फलक लावणाऱ्यांवर क्षेत्रीय कार्यालयामार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच संबंधितांवर गुन्हेही नोंदवण्यात येत आहेत.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com