कोयत्याने वार करून माजवली दहशत
पिंपरी : सतरा वर्षीय मुलावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रहाटणी फाटा येथील जायका टी सेंटर येथे घडली. या प्रकरणी थेरगाव येथील सतरा वर्षीय मुलाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम चव्हाण (रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे रहाटणी फाटा येथील चहाच्या दुकानात गेले असता आरोपीने ‘तू माझ्याकडे काय बघतोस’ असे म्हणत त्यांची कॉलर पकडून गालात चापट मारली. त्यानंतर कोयत्याने हातावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपीने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.
मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना निगडी येथील अंकुश चौकात घडली. या प्रकरणी मोहम्मद जावेद रईसअहमद कुरेशी (रा. ओटास्कीम, निगडी, मूळ - उत्तरप्रदेश) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोहेल कुरेशी, अफजल कुरेशी, इकरार कुरेशी (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सोहेल आणि अफजल यांच्यात भांडण झाले होते. भांडणानंतर आरोपी अफजल याला फिर्यादीसमोर शिव्या दिल्या होत्या. याबाबत फिर्यादी यांनी अफसार याला सांगितले असल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी मोहम्मद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बांबूने आणि लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले.
दोन लाखांचे दागिने लंपास
पिंपरी : घरी येऊन ओळखीचा फायदा घेत मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करीत आरोपी पसार झाले. ही घटना कासारवाडी येथील शास्त्रीनगर भागात घडली. या प्रकरणी मच्छिंद्र संपत देशमुख (रा. शास्त्रीनगर, कासारवाडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य शितोळे (रा. चिखली) आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे फिर्यादीच्या घरी आल्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्याकडून दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन त्यांची फसवणूक करीत आरोपी पसार झाले.
व्हॉट्सॲप हॅक करून साडेसात लाखांचा गंडा
पिंपरी : व्यावसायिकाचे व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये ऑनलाइनद्वारे लंपास केले. ही घटना भोसरीतील शांतीनगर येथे घडली. या प्रकरणी परिमल नबकृष्ण परीडा (रा. शांतीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने फिर्यादी यांचे यांचे व्हॉट्सॲप हॅक केल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्याची माहिती मिळवून सात लाख ४१ हजार ६७१ रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
बँक खातेदारांची ३० लाखांची फसवणूक
पिंपरी : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून पैसे स्वीकारून ते पैसे खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरून अपहार केल्याचा प्रकार चिंचवडमध्ये समोर आला आहे. ही घटना चिंचवडमधील जय हिंद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे घडली. या प्रकरणी बँकेचे वसुली अधिकारी सुधीर विठ्ठलराव आदवडे (रा. एकतानगर, पाषाण) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हनुमंत दशरथ गार्डे (रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा बँकेत दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत होता. त्याने बँकेच्या १२ किंवा त्यापेक्षा जास्त खातेदारांकडून ३० लाख ९१ हजार २५० रुपये स्वीकारले, मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा न करता बँकेची आणि ग्राहकांची फसवणूक केली.
तरुणाला बेदम मारहाण, एकावर गुन्हा
पिंपरी : मित्रासोबत चेष्टा-मस्करी करत असताना झालेल्या गैरसमजातून एका तरुणाला चहाच्या गाड्यावरील झाऱ्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना वाकड पुलाखालील भुजबळ चौक येथे घडली. याप्रकरणी अक्षय ज्ञानोबा मांडेकर (रा. कोथरुड, मूळ - डोंगरगाव, मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल राजेंद्र गर्जे (रा. साखरेवस्ती, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र हर्षल भिसे हे खूप दिवसांनी भेटल्याने एकमेकांशी चेष्टा-मस्करी करत होते. यावेळी ते एकमेकांना शिवीगाळ करत असताना, आरोपी अमोल याला गैरसमज झाला की फिर्यादी हे त्याचा ओळखीचा असलेला हर्षल याच्याशी भांडण करत आहेत. या कारणावरून आरोपीने चहाच्या गाड्यावरील झाऱ्याने फिर्यादीच्या कपाळावर मारून त्यांना जखमी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

