अक्षरशः मृताच्या टाळूवरचे ‘लोणी’ खाण्याचा प्रकार

अक्षरशः मृताच्या टाळूवरचे ‘लोणी’ खाण्याचा प्रकार

Published on

जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर

विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. ४ ः नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आवश्यक साहित्य आधीच उपलब्ध करुन दिले असताना शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) विभागाकडून अक्षरशः मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शवविच्छेदन वेळेवर न करता मृतदेह तास न तास तसाच ठेवून त्याच्या वेष्टणाच्या (पॅकिंग) नावाखाली मृताच्या नातेवाईकांकडून एक ते दीड हजार रुपयांची रक्कम बेकायदेशीररीत्या उकळली जात आहे. विशेष म्हणजे ही रक्कम कोणतीही अधिकृत पावती न देता घेतली जात आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी सहा ते सात शवविच्छेदन होत असतात. नातलगाच्या मृत्यूमुळे आधीच दुःखात असलेले नातेवाईक त्याचा मृतदेह लवकर मिळावा आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये, या भीतीपोटी शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी नाईलाजाने मान्य करत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या नोंदीनुसार, शवविच्छेदन विभागाला चांगल्या प्रतीचे तब्बल १५०० मीटर कापड, १ हजार बॉडी बॅग्ज तसेच आवश्यक कॉटन साहित्य देण्यात आले आहे, असे असतानाही प्रत्यक्षात या साहित्याचा वापर होत नसल्याचा आरोप केला जात आहे. सरकारी निधीतून आलेले साहित्य वापरात न आणता ते गायब केले जाते की जाणीवपूर्वक लपवून ठेवले जाते, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मृताच्या नातेवाईकांकडून पैसे घेणे हे शासकीय नियमांचे उल्लंघन आणि अमानवी वर्तन असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


परस्परविरोधी दावे
शवविच्छेदन विभागातील डॉक्टरांकडे विचारणा केली असता, त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शवविच्छेदन विभागाला कोणतेही साहित्य मिळालेले नाही, असा दावा केला. याचवेळी रुग्णालयाच्या कापड विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी शवविच्छेदन विभागाला चांगल्या प्रतीचे १५०० मीटर कापड आणि १ हजार बॉडी बॅग्ज आधीच देण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रशासनातील या परस्परविरोधी उत्तरांमुळे अंतर्गत गोंधळ किंवा गंभीर स्वरूपाचा अपहार सुरू असल्याचा संशय अधिकच बळावत आहे. साहित्य कुठे वापरले जाते ?, कोणाच्या ताब्यात आहे ? आणि त्याची नोंद कशी ठेवली जाते ? याबाबत कोणतीही पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे.


हलगर्जीपणाचे ‘बळी’
शवविच्छेदन ही कायदेशीर आणि अत्यंत संवेदनशील प्रक्रिया आहे. मात्र त्यामध्ये मृतांचे नातेवाईक आर्थिक शोषणाबरोबरच प्रशासकीय हलगर्जीपणाचे ‘बळी’ पडत आहे. मृताच्या नातेवाईकांचे आर्थिक शोषण होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विभागातील साहित्य वापराची स्वतंत्र चौकशी करावी. नातेवाईकांकडून सुरू असलेली ही बेकायदेशीर वसुली तत्काळ बंद करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

बेजबाबदारपणाचा कळस...
- शवविच्छेदनासाठीही कर्मचाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’
- मृतदेह आच्छादनासाठी एक ते दीड हजारांची वसुली
- पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव
- पोलिस चौकी असूनही पोलिस गैरहजर, पंचनामा करुन घेण्यासाठी शोधाशोध.
- वेळेत शवविच्छेदन न झाल्याने अंत्यसंस्कारास उशीर
- डॉक्टर, कर्मचारीही गायब, तास न तास मृतदेह शवविच्छेदनाविना पडून

शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याचा पुरवठा जिल्हा रुग्णालयामार्फत नियमितपणे करण्यात येतो. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमांनुसार कडक कारवाई
करण्यात येईल.
- डॉ.नागनाथ यमपल्ले, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय


जिल्हा रुग्णालयातील शवागारात शवविच्छेदनानंतर मृतदेह आच्छादित करण्यासाठी लागणारे कापड व बॅग रुग्णालयाकडून पुरवली जाते. तरीही काही कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांकडून हजार ते बाराशे रुपयांची मागणी करून अडवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. शोकाकुल अवस्थेतील नातेवाईकांची अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.
- रविराज साबळे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com