नियमांच्या अडसरामुळे परवाना प्रक्रिया रखडली
पिंपरी, ता. ४ : शहरातील हजारो पथविक्रेते आजही परवान्यापासून वंचित आहेत. या प्रक्रियेतील गुंतागुंतीच्या नियमांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने धोरणे आखली असली, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणावर विक्रेते परवान्यापासून वंचित आहेत. काहींना कागदपत्रांची पूर्तता करूनही परवाने मिळत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
पथविक्रेता परवान्यासाठी ओळखपत्र, निवासाचा पुरावा, व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे तसेच सर्वेक्षणातील नोंद आवश्यक आहे. मात्र, अनेक विक्रेत्यांकडे कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांचे अर्ज अपूर्ण ठरत आहेत. विशेषतः स्थलांतरित कामगार, छोटे व्यावसायिक आणि अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे विक्रेते या प्रक्रियेत अडकले आहेत. परवाना नसल्यामुळे पथविक्रेत्यांना वारंवार कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मालमत्ता जप्ती, दंड आकारणीची कारवाई भरारी पथकामार्फत केली जाते. यामुळे दैनंदिन उत्पन्न आणि थेट उपजीविकेवर परिणाम होत आहे. काही विक्रेत्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला आहे.
यावर नियम सुलभ करण्याची, सर्वेक्षण प्रक्रिया पुन्हा राबवण्याची आणि कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याची मागणी पथविक्रेत्यांच्या संघटनांनी केली आहे; तर सर्वेक्षणात बोगस व्यक्तींची घुसखोरी झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. परवाने वाटपात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप काही महापालिका पथविक्रेता समितीतील सदस्यांनी केला आहे. त्यामुळे मूळ विक्रेता पात्र असूनही त्यांना परवाना मिळालेला नाही. कारवाईच्या भीतीपोटी दबावाखाली त्यांना व्यवसाय करावा लागत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करत आहोत. महापालिकेच्या सर्वेक्षणात नाव असूनही आजपर्यंत परवाना मिळालेला नाही. आवश्यक कागदपत्रे नसल्याचे कारण दिले जाते, पण ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जात नाही. परवाना नसल्यामुळे रोज कारवाईची भीती असते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आहे.
- तुकाराम पवार, पथविक्रेता
शासनाने पथविक्रेत्यांसाठी योजना जाहीर केल्या असल्या, तरी त्या कागदावरच मर्यादित आहेत. नियम इतके कठोर आहेत, की सामान्य विक्रेत्यांना ते पाळणे शक्य नाही. परवाना नसल्यामुळे आमच्यावर दंड, माल जप्ती अशा कारवाया केल्या जातात. नियम सुलभ करून तातडीने परवाने द्यावेत, अन्यथा आमच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे.
- लक्ष्मण कानडे, पथविक्रेता
परवाना वाटप कधी पूर्ण होणार?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पथविक्रेत्यांना अधिकृत परवाने वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे कामकाज अचानक थांबवण्यात आले आहे. परवाना वाटप का थांबवले, तसेच ते पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याने पथविक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आतापर्यंत केवळ सुमारे ५०० पथविक्रेत्यांनाच परवाने देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार पथविक्रेत्यांना परवाने वाटप करण्याचे नियोजन होते. मात्र, प्रक्रियेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही एक हजार पथविक्रेत्यांनाही परवाने मिळू शकलेले नाहीत.
PNE26V92768
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

