

प्रासंगिक
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षामार्फत आशा सेविकांच्या माध्यमातून दिव्यांगांचे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आगामी दोन महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याची गती कमी आहे. आशा सेविकांनी दररोज प्रत्येकी किमान १५ ते २० घरांचे सर्वेक्षण केल्यास विहित मुदतीत सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करणे काळाची गरज आहे.
- हरिदास शिंदे, समुपदेशक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी महापालिका योजना राबविते. अनेक दिव्यांग व्यक्तींकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यूडीआयडी नसल्यामुळे दिव्यांगांसाठीच्या सोयी- सुविधांचा लाभ मिळत नाही. दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींबरोबरच संभाव्य दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन योजनांची आखणी करण्यासाठी दिव्यांगांची संख्या समजणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने दिव्यांगांचे घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. पिंपरी, चिंचवड, संत तुकारामनगर, भोसरी, आकुर्डी, निगडी, थेरगाव, सांगवी या आठ झोनमधील एकूण सहा लाख १२ हजार २११ घरांमध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आहे. साधारण चार महिन्यांत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत २० हजार ६१५ घरांमध्ये सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये अवघ्या १ हजार १११ दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात ही दिव्यांगांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. आगामी दोन महिन्यांत दिव्यांग सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे. ६१० आशा सेविका महापालिका हद्दीतील १२८ वॉर्डमधील आठ झोनच्या ८५१ भागांत काम करत आहेत. सर्वेक्षणातील माहिती मोबाईल ॲपद्वारे संकलित केली जात आहे. सुधारित दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्यानुसार असलेल्या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाची ओळख, दिव्यांगत्वाचा स्वीकार व पालकांची भूमिका आणि अशा समन्वयकांचे काम, दृश्य-अदृश्य दिव्यंगत्वाची ओळख, दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आशा सेविकांना झोननुसार प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे महापालिका हद्दीतील संबंधित भागातील दिव्यांग व्यक्ती निरीक्षक म्हणून कार्य करणार आहेत. घरात दिव्यांग असेल अथवा नसेल तरी देखील सर्वेक्षणासाठी आलेल्या आशा सेविकांना सर्व प्रश्नांशी संबंधित माहिती दिली पाहिजे. जेणेकरून ज्या दिव्यांगांकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यूडीआयडी आहे. त्यांच्यासह संभाव्य दिव्यांगांची नोंदणी झाली, तर त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यूडीआयडी मिळवून देणे सोयीस्कर होईल. त्यामुळे सर्वेक्षणासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.
सर्वेक्षण कशासाठी ?
- दिव्यांगांना आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे
- दिव्यांगांसाठीच्या विविध शासकीय सोयी सुविधांचा लाभ मिळवून देणे
- निराधार व संभाव्य दिव्यांगांचा शोध घेणे
- दिव्यांग अधिकार कायद्यानुसार दिव्यांगत्व प्रकारानुसार योजनांची आखणी करणे
- सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणे
- तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना गरजेनुसार विशेष सहाय्य उपलब्ध करून देणे
सर्वेक्षणाचे वैशिष्ट्ये
- महापालिका हद्दीतील घर, हॉटेल, विशेष शाळा, वृद्धाश्रम, निराधार, सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आलेल्या दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलित करणे
- कुटुंबप्रमुख अथवा माहिती देणाऱ्याची प्राथमिक माहिती नोंदवणे
- दिव्यांग व्यक्ती असलेल्या घरातील एकूण दिव्यांग व्यक्तींची संख्या, त्यांची वस्तुनिष्ठ तपशीलवार माहिती घेणे
- दिव्यांगत्व आल्यानंतर घेतलेले उपचार, दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र, सहाय्यभूत उपकरणे, शिक्षण, आरोग्य, कौशल्य, रोजगार, वैवाहिक स्थिती, शिधापत्रिका, गॅस जोड, मतदान
कार्ड, शासकीय योजनेचा लाभ, बँक खाते, मूलभूत सुविधा, छंद, सामाजिक सुरक्षितता याबाबत प्राप्त माहितीप्रमाणे आगामी काळात गरजेनुसार दिव्यांगांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाय योजना आखणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.