

पिंपरी, ता. ७ ः तुम्हाला चित्रकलेची आवड आहे. कथा, कविता लिहिण्याचा छंद आहे. तर मग लागा कामाला, उचला कुंचला आणि चित्र रेखाटून रंगवा. लेखणी घेऊन कथा किंवा कविता लिहा आणि बक्षीस मिळवा. विषय आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा, निसर्ग संवर्धनाचा आणि अलिकडे दुर्मिळ होत चाललेल्या चिऊताईचा अर्थात चिमणीचा.
जागतिक चिमणी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या सहकार्याने आणि पक्षी व निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘चला चिऊ वाचवू अभियान २०२६’ आयोजित केले आहे. त्याअंतर्गत विविध चिमणी स्पर्धांचे सहा ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. अभियानाचे हे अकरावे वर्ष आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘अलाईव्ह’ने केले आहे. कारण, एकेकाळी आपल्या अंगणात बागडणाऱ्या चिमण्या आता दुर्मिळ झाल्या आहेत, ही गोष्ट आपल्या पर्यावरणात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देते. म्हणूनच, निसर्ग आणि जैवविविधतेचा हा अनोखा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत, असे अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक उमेश वाघेला आणि सचिव चैतन्य राजर्षी यांनी कळविले आहे.
स्पर्धेचा उद्देश
चिमणी स्पर्धेच्या माध्यमातून चिमण्या, इतर पक्षी आणि आपल्या आसपासच्या निसर्गाबद्दलचे तुमचे विचार, भावना आणि निरीक्षणे शेअर करायची आहेत. तुमच्या सर्जनशीलतेतून चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी आणि आपण सर्वांनी मिळून या छोट्या जीवांसाठी काहीतरी ठोस कृती करावी, हाच यामागचा उद्देश आहे.
स्पर्धेसाठी नियम
चिमणी चित्रकला स्पर्धा ः स्पर्धकांनी ए-३ आकारातील कागदावर पेन्सिल किंवा कोणत्याही प्रकारच्या रंग माध्यमात काढलेले चित्र पाठवावे. कृपया स्पर्धकांनी एकच चित्र पाठवावे. सर्व वयोगटासाठी स्पर्धा खुली आहे.
चिमणी कथा स्पर्धा ः चिऊताईबद्दल काल्पनिक किंवा स्वानुभवावर आधारित स्वरचित एक कथा, ज्याची शब्दमर्यादा ५०० ते १००० आहे. मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत आपली रचना पाठवू शकता. १८ वर्षांवरील सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे.
चिमणी कविता स्पर्धा ः चिऊताईवर मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत एक स्वरचित कविता पाठवू शकता. कवितेला शब्दमर्यादा नाही. १८ वर्षांवरील सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे.
चिमणी रांगोळी स्पर्धा
तुमच्या दारात, व्हरांड्यात किंवा अंगणात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून चिमणीच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी काढा. यासाठी पारंपारिक रांगोळी, नैसर्गिक रंग, फुले, पाने, धान्य व इतर नैसर्गिक साहित्य वापरू शकता. डिझाइनच्या गरजा ः रांगोळीमध्ये ‘चिमणी’ हा मुख्य घटक असावा. रांगोळीच्या खाली ‘अलाईव्ह - चला चिऊ वाचवू अभियान’ हा संदेश लिहा. शेजाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही रांगोळी जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवा. स्पर्धा १२ वर्षांवरील सर्वांसाठी खुली आहे.
स्पर्धकांसाठी सूचना
- कथा आणि कविता मराठी, गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत गुगल किंवा युनिकोड फॉंटमध्ये टाईप केलेली वर्डफाईल असावी
- सर्व रचना पूर्णपणे स्वरचित असावी. तसेच ती कोठेही कोणत्याही स्वरुपात प्रकाशित झालेली नसावी
- कोठूनही नक्कल केलेली, चोरलेली अथवा एआयद्वारे तयार केलेली कथा किंवा कविता आढळल्यास स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही
- आपली रचना https://alivetrust.in/sparrow या लिंकवर अपलोड करावी
- स्पर्धा कालावधी ६ ते १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत
- कोणत्याही स्पर्धेत प्रवेश शुल्क नाही. वयोगटानुसार सर्व स्पर्धेत भाग घेऊ शकता
- सर्वाधिक सहभाग नोंदविणाऱ्या शाळांना विशेष पारितोषिक देण्यात येईल
- पारितोषिक वितरण सोहळा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी होईल
- स्पर्धा निकाल अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाईटवर तसेच व्हॉट्सप चॅनलवर घोषित करण्यात येईल
- चॅनल जोईन करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन फॉलो करावे. https://shorturl.at/oCjrT
- अधिक माहितीसाठी संपर्क ः ९९२२५०७३३०, ९८८११०१५४१
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.