

‘बेलाच्या पानावर...’ हायकूसंग्रहाचे प्रकाशन
पिंपरी, ता. ७ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे लिखित ‘बेलाच्या पानावर...’ या हायकूसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले.
निगडी प्राधिकरणातील कवयित्री शांता शेळके सभागृहात कार्यक्रम झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम काळे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, मसाप पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, राजन लाखे उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘प्रतिभावंतांनी अत्युच्च स्फूर्तीची प्रतीक्षा करावी. कवितेलाही आचारसंहिता असते, याचे बहुसंख्य कवींना विस्मरण झाले आहे. त्यामुळेच मुक्तच्छंदाला मोकाट छंदाचे रूप प्राप्त झालेल्या आजच्या काळात ‘बेलाच्या पानावर...’ यांसारख्या संग्रहातील छंदबद्ध, आशयसंपन्न हायकू मनाला सुखावणारे आहेत.’’
सुनीताराजे पवार म्हणाल्या, ‘‘अल्पाक्षरी हायकूत खूप मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते.’’ पुणे जिल्ह्यातील मसापच्या विविध शाखाध्यक्ष आणि ‘बेलाच्या पानावर...’च्या निर्मितिप्रक्रियेतील सहभागी व्यक्तींचा सत्कार केला. यात नंदकुमार मुरडे, सुप्रिया ऐनापुरे, अजित जमदाडे यांचा समावेश होता.
किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, इला पवार, नीलिमा फाटक यांनी संयोजन केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. भूषण तोष्णीवाल यांनी पसायदान सादर केले.
---
असे असते ‘हायकू’
सतरा अक्षरे अन् तीन ओळींचे बंधन असलेला हायकू हा कवी मात्सुओ बाशो यांचा मूळ जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी मराठीत रूढ केला. सतरा अक्षरे अन् तीन ओळी याच्या मर्यादेत राहून सुमारे २४० हायकूंच्या माध्यमातून आशयप्रधान भावनांचे चित्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत राजन लाखे यांनी व्यक्त केले.
---
फोटो
९३५५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.