बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून

Published on

पिंपरी, ता. ९ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. सुमारे ३४ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. परीक्षेची तयारी आणि विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. सज्ज आहेत. उद्या सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर आहे.
बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असल्याने विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून अभ्यास करीत आहेत. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होईल. शहरातील २१० कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३ हजार ७३३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. शहरात ३५ परीक्षा केंद्रे असून त्यावर केंद्र संचालकांची नियुक्ती झाली आहे. पर्यवेक्षकही नियुक्त झाले आहेत. त्याशिवाय प्रत्येक केंद्रावर साहित्य पोहोचवणे आणि केंद्रावरून मुख्य ठिकाणी परत आणण्यासाठी परीक्षकही काम करतील. प्रत्येक केंद्रावर एक शैक्षणिक साहित्य पुरवणारा पर्यवेक्षक, लिपिक असतील. हे कर्मचारी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


बैठक व्यवस्थेबाबत आवाहन
मंडळाने बैठक व्यवस्था दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवरही अनुक्रमांक, परीक्षा केंद्र आणि वर्गाची माहिती लावण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेतून किंवा महासंकेतस्थळावरून बैठक क्रमांक तपासू शकतात. प्रत्येक विषयानुसार केंद्र कार्यरत आहेत.


‘कॉपीमुक्त अभियानासाठी दोन भरारी पथके
बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व शिक्षण मंडळाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने महापालिका हद्दीतील परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानाची तयारी केली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियत्रंणाखाली दोन भरारी पथकांची नेमणूक झाली आहे. ही पथके संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी गैरप्रकार होऊ नयेत म्हणून दक्षता घेईल. सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्राध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. गैरप्रकाराला उद्युक्त करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गैरमार्गांचा वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा १९८२ अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

दोन कस्टडी केंद्रे तयार
परिक्षेशी संबंधित साहित्य गोपनीय ठेवण्यासाठी प्रत्येक दहा केंद्रांमागे एक यानुसार दोन कस्टडी केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. तेथे साहित्य सुरक्षित ठेवले जाईल. तेथून ते परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचवले जाईल.

आकडे बोलतात
कनिष्ठ महाविद्यालये - २१०
परीक्षार्थी - ३३ हजार ७३३
परीक्षा केंद्रे - ३५
केंद्र संचालक -३५
कस्टडी केंद्र -२
भरारी पथक - २
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com