निगडीतील टिळक चौकात जिवाशी खेळ
पिंपरी, ता. ११ : निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात मात्र दररोज जीवघेणा प्रवास नागरिकांच्या नशिबी येतो आहे. गेली अनेक वर्षे या चौकातील बेशिस्त वाहतूक, ‘आरटीओ’च्या दुर्लक्षामुळे रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. तर,
मुजोरपणा याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या, पण उपाययोजना शून्य असल्याचा आरोप होत आहे.
टिळक चौकात पहाटे बाहेरगावाहून येणाऱ्या खासगी बसेस चौकात कुठेही, कशाही थांबवल्या जातात. पवळे पुलाखाली, भर चौकात बस थांबवून ड्रायव्हर सर्रास निघून जातात. काही वेळा तर बस चालू अवस्थेतच सोडली जाते. यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. अपघातांचे प्रमाण वाढते आणि सामान्य नागरिकांचे हाल होतात. आजपर्यंत अनेक अपघात येथे घडले आहेत, तरीही प्रशासन डोळे झाकून बसले आहे.
सीसीटीव्ही कोणासाठी?
चौकातील सीसीटीव्ही नेमके कोणासाठी काम करतात? ते फक्त शोभेपुरते आहेत का? जर ते कार्यरत असतील, तर त्यावरून कारवाई का केली जात नाही? जबाबदार नेमके कोण? आरटीओ, वाहतूक विभाग की प्रशासनाची अनास्था? हे प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत.
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचेच आहे. पण, जेव्हा नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाईच होत नाही, तेव्हा स्वयंशिस्तही संपते. रिक्षाचालक, बसचालक, खासगी वाहनचालक सर्वांनी नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे, कारण रस्ता हा कुणाच्या मक्तेदारीचा नाही.
- यशवंत कण्हेरे, महात्मा फुलेनगर
शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये दिवस-रात्र पाळीमध्ये वाहतूक शाखेची उपस्थिती, कठोर कारवाई आणि सततची देखरेख अत्यावश्यक आहे. केवळ फलक लावून, घोषणा करून प्रश्न सुटणार नाहीत; प्रत्यक्ष कृती हवी. नागरिकांचा रोष वाढतो आहे.
- शिवानंद चौगुले, चिखली कृष्णानगर
सकाळी कामाला जाणाऱ्यांची घाई, विद्यार्थ्यांची धावपळ, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना होणारी कसरत या सगळ्यांवर थेट परिणाम होतो. सामान्य माणूस जीव मुठीत धरून प्रवास करतो आहे. हे चित्र स्मार्ट सिटीला शोभणारे आहे का?
- गजानन ढमाले, निगडी
टिळक चौकात खासगी बस थांबवल्या जातात. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या खासगी बसवर कारवाई वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली पाहिजे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
टिळक चौकात वारंवार खासगी बसवर कारवाई करत आहोत. काही जणांना दंड आकारला आहे, तरी पुन्हा एकदा कारवाई करण्यात येईल.
- नीता गायकवाड, पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग, निगडी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

