तब्बल तीन लाख विद्यार्थी कागदोपत्री ‘शालाबाह्य’
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ : पिंपरी, ता. ११ : आधार आणि ‘यूडायस प्लस’ या पोर्टलवरील शैक्षणिक नोंदणीत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. यात आधार कार्ड अद्ययावत नसलेले शहरातील तब्बल दोन लाख ९६ हजार ७७८ विद्यार्थी शालाबाह्य ठरण्याची भीती आहे. याचा थेट फटका शाळांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रणालीतील घोळामुळे अनेक शाळांमधील प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी कागदोपत्री दिसत नाहीत. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख किंवा अन्य माहितीतील तफावतीमुळे सुमारे १३ हजार ८६७ विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरत आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदी संकटात सापडल्या आहेत. परिणामी, लाखो विद्यार्थी ‘शाळाबाह्य’ किंवा ‘अवैध’ ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संचमान्यता करण्यात येते. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी केली जात आहे.
शाळेत येतोय, पण कागदोपत्री गायब
‘यूडायस प्लस’ प्रणालीमध्ये आधार पडताळणी आवश्यक असल्याने अनेक विद्यार्थ्यांची नोंद अपात्र (इन्व्हॅलिड), उपलब्ध नसलेले (नॉट प्रोव्हायडेड) किंवा पडताळणीतील (अंडर व्हेरिफिकेशन) अशा टप्प्यात अडकली आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नियमित बसत असतानाही तो सरकारी प्रणालीत शाळेबाहेर दाखवला जात आहे. या विद्यार्थ्यांना शालाबाह्य म्हणून वर्गीकृत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शाळांच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होत असून, त्याचा थेट फटका शिक्षक भरती, अनुदान, मध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सुविधांवर बसत आहे.
विद्यार्थ्यांच्या माहितीतील चूक दुरुस्त केली नाही, तर पुढील काही वर्षांत हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधारबाबत हरकती नोंदवाव्यात.
- महेंद्र गणपुले, सदस्य, राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती
आधार कार्ड नाही, कारण त्यांचे आई-वडील किंवा कुटुंबातील कोणीही आधार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपस्थित नाही. शिकत असूनही सरकारी नोंदीत ‘शालाबाह्य’ प्रत्यक्षात या मुलींना आम्ही शाळेत प्रवेश दिला आहे. त्या नियमित शिकत आहेत. मात्र, आधार कार्ड नसल्यामुळे सरकारी प्रणालीत त्या ‘शालाबाह्य’ म्हणून दाखवल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही.
- नीलेश गायकवाड, मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय (भोसरी)
माझा मुलगा रोज शाळेत जातो. पण शिक्षक म्हणतात की, त्याचे नाव ‘यूडायस प्लस’मध्ये दिसत नाही. कारण आधार अपडेट झालेले नाही. मग तो पुढे परीक्षा देणार का? त्याला शिष्यवृत्ती मिळणार का? आमचे हातावरचे पोट आहे. आधार दुरुस्तीसाठी सुट्टी कशी घेणार? पण सरकारला आमच्या अडचणी दिसतच नाहीत का?
- संतोष देवकर, पालक
आधार, यूडायस प्लस यंत्रणेत नोंदणीसाठी सतत ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बैठका सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थी व पालक यांच्या आधार कार्डमध्ये चुका असल्याचे अपार नोंदणी होत नाही, तर यूडायस नोंदणीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
एकूण यूडायस प्लस नोंदणीकृत विद्यार्थी : ४, ५०, ९४८
आधार माहिती सबमिट केलेले : ४, ३९, १०२
पडताळणीअंती वैध आधार : ४,२४,८८१
अवैध आधार : १३, ८६७
आधार अद्ययावत न केलेले : २,९६,७७८
तपासणी प्रक्रियेत असलेले : १,२७,९९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

